
.. नाशिक ( प्रतिनिधी ) संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे अशा प्रकारचे सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख आणि महत्त्वाचे काम मागील ३६ वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस करीत आहे. युवा वर्गाला ह्या कामाचे महत्त्व कळावे आणि त्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे नवीन कार्यकर्ते घडावेत व सतत कार्यरत राहावेत यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक शहर व नाशिक रोड शाखेच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी दुपारी एक ते पाच ह्या वेळेत जनता विद्यालय, गांधी नगर ,नाशिक रोड येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्र अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच अंधश्रद्धा व दैवीशक्ती असल्याचे भासवून चमत्काराच्या बहाण्याने भोंदू लोक समाजाला कसे फसवतात, कसे शोषण करतात याबद्दल प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून , प्रशिक्षणार्थींकडून त्याचा सराव करून घेण्यात येईल. अंनिसच्या जुन्या ,नव्या कार्यकर्त्यांसह तरुणतरुणींना या शिबिरात सहभागी होता येईल. शिबिर निःशुल्क असून प्रशिक्षणार्थींनी वही, पेन व इतर आवश्यक साहित्य सोबत आणावे. संपर्कासाठी नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे ( 8999702946 )व नाशिक रोड कार्याध्यक्ष एडवोकेट स्वाती तेलगोटे- वाव्हुळ (9975878641)यांच्याशी संपर्क साधावा . या महत्वपूर्ण प्रशिक्षण शिबिरात विशेषतः तरुण- तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल व अरुण घोडेराव यांनी केलेले आहे.
