
अकोला- बिर्ला कॉलनी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये 12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभर साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि ग्रंथालयाचे महत्त्व समजावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात व ग्रंथपाल सोनाली यदू यांच्या नियोजनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्ग 8ची संस्कृती भगत या विद्यार्थिनीने डॉ. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर आणि ग्रंथालय शास्त्रातील त्यांच्या योगदानावर माहिती दिली. या प्रसंगी शाळेच्या ग्रंथालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. शाळेच्या शैक्षणिक समन्वयक वैशाली अवचार व प्राथमिक विभागाच्या निरीक्षक मेघा कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “ग्रंथालय हे ज्ञानाचे मंदिर आहे. पुस्तके आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.

वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते, शब्दसंग्रह सुधारतो आणि आपल्या ज्ञानात भर पडते. मोबाइल आणि इंटरनेटच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही.” या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुस्तके आणि ग्रंथालयाचे महत्त्व जाणून घेतले. शाळेच्या ग्रंथपाल सोनाली यदू यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा प्रभावीपणे वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांची यादव या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना दररोज किमान एक पुस्तक वाचण्याची प्रेरणा देऊन करण्यात आली.
