
लोहोणेर येथील जनता विद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना एपीआय नंदा पाटील. सोबत मविप्र संचालक विजय पगार, पी.आय. सार्थक नेहते व मान्यवर. (छाया – सुनिल एखंडे)
लोहोणेर जनता विद्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांचे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे..
. लोहोणेर –(प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार होते.व्यासपीठावर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष दीपक देशमुख, माता-पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख, शालेय समिती सदस्य पंडित निकम, दिगंबर कोठावदे, आबासाहेब देशमुख, वसंत शेवाळे, युवराज बागुल, डॉ. सुभाष आहेर, संजय सोनवणे, अविनाश महाजन, संजय जगताप, पोलीस पाटील अरुण उशीरे, मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, पर्यवेक्षक व्ही. एम. निकम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर पंडित निकम यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थिनींशी संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील म्हणाल्या, आजचा काळ डिजिटल युगाचा आहे. तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीची दारे उघडून देत असले तरी त्यात धोकेही आहेत. मुलींनी आपला मोबाईल व सोशल मीडिया वापर विचारपूर्वक करावा. ओळखीचे नसलेल्या व्यक्तींना वैयक्तिक माहिती कधीही देऊ नये, संशयास्पद मेसेज किंवा लिंक त्वरित डिलीट करावी. ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ याचा नीट विचार करून स्वतःचे रक्षण करा. रोज सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा चांगला अभ्यास करून यश संपादन करा आणि आई-वडिलांचे समाजात खरे स्टेटस वाढवा. तुम्ही साहसी, आत्मविश्वासी व जागरूक राहिलात तर कोणीही तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकत नाही.पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की तुमच्यातील कल्पकता आणि जिज्ञासा हीच तुमची खरी ताकद आहे. इंटरनेट आणि डिजिटल साधने ही तलवारीसारखी आहेत ती चांगल्या कार्यासाठी वापरली तर यश मिळते, चुकीसाठी वापरली तर अपाय होतो.

ऑनलाईन फ्रॉड, हॅकिंग, बनावट ओळखी, फसवे ईमेल याबद्दल सजग राहा. काहीही संशयास्पद घडले तर पालक, शिक्षक किंवा पोलिसांना त्वरित कळवा. तुमची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, आणि तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आम्ही नेहमी तयार आहोत.अध्यक्षीय मनोगतात विजय पगार म्हणाले, आपली संस्कृती आणि मूल्ये हीच आपली खरी ताकद आहे. डिजिटल साधनांचा उपयोग शिक्षण, संशोधन व प्रगतीसाठी करावा, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून थोडं अलिप्त राहून कौशल्य विकासावर भर द्यावा.या कार्यक्रमात ए.आय. इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेबसाईट्स व मोबाईल अप्लिकेशन्सचे प्रदर्शन झाले. उद्घाटन करताना पी.आय. सार्थक नेहते यांनीही विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे कौतुक केले. या प्रसंगी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी छोटू वाघ, राकेश थोरात, ए.आय. इन्स्टिट्यूटचे वैभव आहिरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे, विद्यार्थिनी अनुष्का दशपुते, खुशी बोरसे, अश्विनी शेवाळे, तेजस्विनी पवार यांनी केले.
