
अकोला – बिर्ला कॉलनी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये आज ‘अनामविरा’ या संकल्पनेवर आधारित आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीची भावना जागृत केली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक शाळेतील स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर केली. देशभक्तीपर गाण्यांनी सभागृहात देशभक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक हर्षवर्धन मानकर यांनी केले. त्यांनी गाण्याची निवड, गायनाचा दर्जा, सूर, ताल आणि सादरीकरण या सर्व गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले. कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक गुणांचा विकास होतो आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होते. संगीत हे एक असे माध्यम आहे जे आपल्याला एकत्र आणते आणि देशावर प्रेम करायला शिकवते.”विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत समूहगान स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक विवेकानंद इंग्लिश स्कूल तर तृतीय क्रमांकाचे मानकरी जुब्ली इंग्लिश हाय स्कूलची चमू ठरली. तर एकल गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक बालशिवाजीचा स्वराज समीर थोडगे याने पटकावला ,द्वितीय क्रमांक जी.डी.प्लॅटिनम जुबलीची सानवी वाकोडे हिने मिळवला तर तृतीय क्रमांकाची मानकरी विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल ची राघवी ताजने ही ठरली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुणांना वाव मिळाला, तसेच स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात भर पडली. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात शाळेचे संगीत शिक्षक सागर म्हसाळ व भावना म्हसाळ यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील हिंदी विभाग प्रमुख ज्योती तिवारी यांच्या मार्गदर्शनात समृद्धी शिरसाट,श्रावणी देशमुख, गायत्री बाभुळकर ,वैष्णवी गावंडे,जानवी खांबलकर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
