लेखन:- योगाचार्य अशोक पाटील नाशिक.

कवी विवेक सुशीला चिंतामण उगलमुगले यांना शब्दांच्या कवेत घेणे माझ्यासारख्याला तरी थोडे अवघडच आहे. विवेकचा विवेकीपणा! हे नावच त्यांना यथार्थ आहे. कवी विवेकची ऋजुता, सोज्वळता, शालीनता, नाशिक जिल्ह्यातील कवी मित्रांमध्ये प्रिय अशी राहिलेली आहे. त्यांचा साहित्य विश्वातील परीघ मुख्यत्वे नाशिक जिल्हा असला तरीही, हा परीघ हळूहळू महाराष्ट्रभर विस्तारत चालला आहे. हेही तितकेच खरे. एखाद्या साहित्यिक – सांस्कृतिक विषयासंबंधी त्यांचं बोलणं असो किंवा एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केलेले त्यांचं एखादं छोटेखानी मनोगत असो ,ते अतिशय जबाबदारीने,नेटक्या तपशिलाने, बारकावे मांडत व्यक्त होतात. त्यांचा दैनंदिन वावर हा प्रामुख्याने साहित्य, सामाजिक जीवनामध्ये असला तरी हा माणूस छानपैकी कुटुंबवत्सलही आहे. त्यांच्या साहित्यिक गोतावळ्यात जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, कवी रवींद्र मालुंजकर ,प्रा. राज शेळके, राजेंद्र उगले, अरुण इंगळे. किरण भावसार, सुभाष सबनीस, अनंत चौधरी, तुकाराम ढिकले, सोमनाथ साखरे , पुंजाजी मालुंजकर, गिरणा गौरवचे सुरेश पवार,संजय आहेर, डॉ.अश्विनीताई बोरस्ते, मनीषाताई कुलकर्णी, जयश्रीताई वाघ,अलकाताई दराडे आदींची नावे प्राधान्याने घेता येतील.

मध्यंतरी एक विशेष निमित्त होते, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दीड शतक जयंतीमहोत्सवाचे ! महात्माजींच्या आकंठ प्रेमात व ऋणात असलेल्या या कवीने,त्या आपल्या उत्कट प्रेमापोटी *आतला आवाज* हा बापूजींच्या संदर्भाने एक काव्यसंग्रह प्रकाशित केला,व त्यांच्याविषयीचा आपला अक्षर आदरभाव व्यक्त केला.पूज्य बापूजी आणि एक सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये असलेले वैचारिक अंतर, बापूंजींची आदर्श जीवनपद्धती, त्यांचं सतत कार्यमग्न असणं, सत्याप्रती असलेली त्यांची तळमळ,त्यांची प्रामाणिकता उलटपक्षी सर्वसामान्यांच्या असलेल्या मर्यादा, त्यांच्या पळवाटा, त्यांचं खुजेपण…अशी प्रातिनिधिक स्वरूपात स्वतःचीच तुलना कवी ,चक्क बापूजींसोबत करतो.त्यासाठी बापूजींच्या आयुष्यातील महत्वाच्या काही घटना, प्रसंग,विचार अशा अर्थाने या कविता आलेल्या आहेत.महात्मा गांधीजींना किंवा त्यांच्या जीवन पद्धतीला, विचारशीलतेला आत्मसात करताना आपली झालेली दमछाक,प्रयत्न,असोशी , आदर असा या कवितेचा पट आहे.बापूजींशी आत्मसंवाद आणि तोही कमालीच्या साधेपणातून ! ही या कवितेची एक ओळख सांगता येईल. बापूजींना समजून घेताना कवीची ज्ञानभूक,जिज्ञासा फार विलक्षण आहे. आजवर बापूजींच्याबद्दल जगभर भरपूर लिहिलं गेलं आहे आणि त्यात खंडही पडलेला नाही. मग तू आणखी काय वेगळं आणि तेही कवितेतून सांगणार ! म्हणून कवीला चेष्टेने विचारणाही झाली.तरीही एका आत्यंतिक प्रेमापोटी,आदरापोटी कवीने आतला आवाज जाणीवपूर्वक लिहिला. हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा कवीचा हा प्रामाणिक प्रयत्न पानोपानी जाणवतो.बापूजींच्या महान कार्याने, त्यांच्या थोर विचारांच्या अभ्यासाने कवी अधिक नम्र होत गेला असावा ! असे मला वाटते.*आतला आवाज* हा काव्यसंग्रह बापूजींविषयी, कवीच्या असलेल्या निस्सिम प्रेमातून ,त्यांच्या विषयीच्या कृतज्ञतेतून या कवितांची निर्मिती झाली असावी,असे जाणवते.या कविता म्हणजे कवीच्या काळजातून आलेला एक प्रामाणिक असा आवाज आहे. त्याला ते आपला ‘वेडा अट्टहास’ असं म्हणतात. संग्रहातील प्रत्येक कविता साधी,सोपी आहे.एखाद्या लहान मुलाने आपल्या आजोबांशी प्रेमानं बोलावं ! इतका आपलेपणा,इतकी प्रांजळता, आपल्या मनातील एखादी शंका,सल,वेदना मांडणारा असा एखादा कवी विरळाच असतो. मग तो दुनियेची फार कदर करत नाही. त्यात कमालीची निखळता आणि प्रामाणिकता जाणवते राहते. महात्मा गांधींजी यांच्याविषयी कवीच्या मनात बालपणापासूनच एक आंतरिक ओढ आहे. विलक्षण आदरभाव अन् अतूट असे बंध आहेत. हा प्रभाव किंवा बापूंजींचं विश्वव्यापी मोठेपण त्यांना प्रेरणा देत रहातं.बापूजींची कार्यमग्नता समजून घेऊन आपणही नुसतं रूटीन आयुष्य जगण्यापेक्षा वाचकचळवळीसाठी,साहित्यासाठी काहीतरी करत रहावं ! असा त्यांचा स्वभाव घडलेला…अर्थात यामागे प्रेरणा आहे ती बापूजी आणि साने गुरुजींची!याच विचारातून महात्मा गांधीजी हे नव्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावेत ! तरुणाईने त्यांच्या विचाराने मार्गक्रमण करावं!असा कवीचा प्रयत्न यातून दिसून येतो. हे सगळं बापूजींचं थोरपण कवितेतून मांडताना , कवीच्या मनातील घालमेल, अस्वस्थता आणि एक भारावलेपण या कवितेत हळुवारपणे व्यक्त झालेलं आहे. त्यांच्या या व इतर कविता वाचल्यानंतर खरोखर मला असे म्हणावे वाटते, की हा माणूस साहित्य क्षेत्रातील एक सच्चा गांधीवादी माणूस आहे. याशिवाय त्यांच्या इतर साहित्यसंपदेबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आणखी काही*कवितासंग्रह* असे आहेत.*दिवाण्या आणि तोड्या *मनातल्या मनात वाचायच्या कविता *सायकलवरच्या कविता*आठवणींची फुले*सांगावेसे वाटते म्हणून…*बाल कवितासंग्रह_* *दाट साईचे गाव*हॅपी होम *रोजनिशी एका चिमुरडीची*प्रिय आई बाबांच्या शोधात*ओन्ली फॉर चिल्ड्रन *व्यक्तीचित्र संग्रह**शोध माणूसपणाचा अशा त्यांच्या या पुस्तकांना आजवर तिफण, कविवर्य नारायण सुर्वे, बिरसा मुंडा, लक्ष्मीबाई टिळक, कवी गोविंद, डॉ. अ. वा. वर्टी, अंकुर, वैनतेय आदी पुरस्कारांसह महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा बालकवी पुरस्कार प्राप्त आहेत.सिन्नर व इगतपुरी येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची व दोन साहित्य संमेलनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी, देशदूत या वृत्तपत्रातून त्यांनी सदरलेखनही केलेलं आहे.वाचन, लेखन, चिंतन-मनन, कुटुंब, मित्र, वाचनालय येथे कायम व्यस्त असलेला आमचा हा मित्र वाचक चळवळीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे.हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे आहे. .
