
-सोनांबे (बातमीदार पाटोळे ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शतकोत्तर एकादश वर्षानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील टेक्निकल सपोर्ट रेजिमेंटमधील जवानांना शाळेतून तब्बल १११ राख्या व मिठाई भेट देण्यात आली.शाळेतील ८३ विद्यार्थिनी, पाच शिक्षिका, एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत कार्यरत सहा अंगणवाडी सेविका- मदतनीस ताई व सात माता-पालकांनी प्रेमपूर्वक या राख्या तयार करून संकलित केल्या.

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी या राख्या व मिठाई देवळाली येथे वर्कशॉपचे सीएफएन विशाल डोईफोडे, योगेश कराड, सुनील आव्हाड यांच्याकडे सुपूर्द केल्या. विशेष म्हणजे जवान योगेश कराड हे पाटोळे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.आपल्या घरापासून दूर असलेल्या देशरक्षकांना शाळेतील मुलींनी राख्या व स्वतःच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा पत्रे पाठवून भावनिक बंध दृढ केला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी देशसेवेसाठी झटणाऱ्या वीर जवानांविषयी कृतज्ञता व अभिमान व्यक्त केला.या उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षक सुनिता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, अनिता दातीर, स्वाती खताळे, सुनिता भिसे यांनी संयोजन केले.गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बागूल, कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून स्वागत केेले आहे.
