
आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना प्रा. अदिती काळे यांच्या समवेत महाविद्यालयातील प्राध्यापक प्राचार्य
रावळगाव :-(.प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ०८ ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र प्रमुख व विज्ञान शाखा प्रमुख असलेल्या प्रा. अदिती काळे यांनी आपला वाढदिवस केक कापून पारंपरिक पद्धतीने साजरा न करता आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आपला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. अदिती काळे यांचा वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा. अदिती काळे म्हणाल्या की, माणूस जोपर्यंत निसर्गाशी मैत्री करून निसर्गात राहत होता तोपर्यंत अतिशय सुरक्षित व दीर्घायुषी होता, परंतु औद्योगिक क्रांती नंतर मानव मोठ्या प्रमाणात निसर्गावर अतिक्रमण करू लागला आणि निसर्ग व मानव यांच्यातील नात्यात वैर वाढत गेले, त्यामुळे वेळोवेळी निसर्ग आपले रौद्ररूप धारण करत असल्याचे दिसून येतो, याचा मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊन मानवी भविष्य धोक्यात येताना नेहमीच दिसून येत आहे, त्यामुळे सुरक्षित मानवी भाविष्यासाठीचं नव्हे तर आपल्या प्रत्येकांच्याच वाढदिवसांची संख्या वाढवण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख, तथा महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या प्रमुख प्रा. अदिती काळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. कावेरी जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे तसेच प्रा. दिव्यानी निकम , प्रा. हर्षदा पवार यांनी परिश्रम घेतले. उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. अदिती काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश वाघ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांनी केले.
