
जळगाव निंबायती – (वार्ताहर) अन्न व औषध प्रशासन विभाग तथा के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ईट राईट इंडिया’ राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती मोहीमेंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

नाशिक येथील के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ऋतुजाला जिल्हाधिकारी जलज शर्मा व अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याहस्ते तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांनी सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल १५६ निबंधातून ऋतुजाला प्रथम क्रमांक मिळाला. ऋतुजाला प्रा. प्रशांत देवरे यांनी मार्गदर्शन केले. निबंध स्पर्धेबरोबर भित्तीचित्र, वत्कृत्व, प्रश्नमंजुषा, पाककला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ऋतुजाचे अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
