
शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना रवींद्र मालुंजकर. समवेत संस्थेचे अध्यक्ष जयराम कुलकर्णी, सचिव अविनाश गोसावी, ज्योती जोशी.
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन महत्त्वाचे असते. वक्ता आणि श्रोता यांतील दुवा असणारा परिपूर्ण सूत्रसंचालक हाच कार्यक्रमाचा आत्मा असतो, असे विचार कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांनी व्यक्त केले. शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था आयोजित ‘सूत्रसंचालनावर बोलू काही’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाध्यक्ष जयराम कुलकर्णी आणि सचिव अविनाश गोसावी मंचावर उपस्थित होते. मालुंजकर पुढे म्हणाले की, सूत्रसंचालकाचा पेहराव साजेसा असावा. त्याने शब्दफेक आणि शब्दोच्चार यांची काळजी घ्यावी. कार्यक्रम परिसरातील विविध मौलिक माहितीचा ठेवा त्याच्याकडे असावा. सूत्रसंचालकाला गायनाचे थोडेफार ज्ञान असावे. कविता, सुभाषिते, सुविचार सांगताना अचूक शब्दफेक, आरोह-अवरोह व्यवस्थित असावे. नेहमी वाचन करत उत्तमोत्तम विचारांचे टिपण त्याने काढावे. मोजके आणि आवश्यक बोलावे. कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमापूर्वीच माहीत करून घ्यावी. त्यातून नवे आणि यशस्वी सूत्रसंचालक घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी भाषणात व्याख्यानविचारांबद्दल समाधान व्यक्त केले. कामगारनेते प्रशांत कापसे, मोतीराम जाधव, संतोष जोपुळकर यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. उपसचिव श्रीकांत मोहरील, रवींद्र चंद्रात्रे, उपखजिनदार, परमेश्वर चिंतकिंदी, सुधाकर सोनवणे, प्रदीप भालेराव, अनिल सहस्रबुद्धे, राम कुलकर्णी, चांगदेव बोराडे, ॲड.गोविंद पांडे, रमाकांत होनराव, चंद्रकांत झाडीकर, मेखला रास्वळकर, वैदेही कुलकर्णी, वैजयंती चंद्रात्रे, कल्पना वैद्य, शैलजा कुलकर्णी, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे, सुप्रिया बनसोड यांनी परिश्रम घेतले. परिचय सुनंदा गोसावी यांनी करून दिला. आभार रेखा नाशिककर यांनी मानले. सूत्रसंचालन ज्योती जोशी यांनी केले.
