
नाशिक ( प्रतिनिधी): केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र म्हणजे ‘स्पर्धा परीक्षा:तयारी यशाची’ हे पुस्तक आहे. विद्यार्थीच नव्हे, तर पालकांचेही समुपदेशन करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘स्पर्धा परीक्षा:तयारी यशाची’ या साहित्यकृतीवर त्यांनी हुतात्मा स्मारकात संवाद साधला. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर अध्यक्षस्थानी होते. श्री.परिहार पुढे म्हणाले की, समाजात ज्ञानाची, विचारांची आणि संस्कारांची पेरणी करणे; हाच कोणत्याही पुस्तकाचा मुळ उद्देश असतो. तसाच हे पुस्तक लिहिण्यामागे होता. त्यासाठी सलग सात वर्षे अभ्यास आणि अनंत अडचणीना तोंड द्यावे लागले. परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यापासून मागील वर्षभरात मिळालेल्या प्रतिक्रिया पाहता या प्रयत्नांना यश आल्याची पावती मिळाली आहे. याच पुस्तकातून प्रेरणा घेत बीड येथील एका खाजगी संस्थेने त्यांच्या नियमित अभ्यासक्रमात बदल करून या पुस्तकातील मांडणी वापरत आहेत, हे या पुस्तकाचे यशच म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले. राजेंद्र देसले आणि जगदीश कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर वैजयंती सिन्नरकर यांनी आभार मानले. दरम्यान, या उपक्रमात येत्या शुक्रवारी (दि.१४) दामोदर मानकर हे ‘सुविचार खजिना’ या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.फोटोओळी:-गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात बोलताना ब्रिजकुमार परिहार. समवेत ज्येष्ठ ग्रामीण लेखक पुंजाजी मालुंजकर.
