
सिन्नर (प्रतिनिधी ) स्पर्धेच्या युगाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन गुणवत्ता संपादन केली पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळ, कला, वक्तृत्व यातही नैपुण्य मिळवत अवांतर वाचन केले पाहिजे. वाचनाचा छंद आयुष्यभर जोपासला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक किशोर राठी यांनी केले. नायगाव येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. येवला येथील लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कलकत्ते होते. व्यासपीठावर माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष अशोकराव लोहकरे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाबळे, अभिनव बाल विकास विभागाचे शालेय समिती अध्यक्ष काशिनाथ लोहकरे, माजी सरपंच विष्णुपंत पाबळे समाधान कदम, कवी किरण भावसार ,रामदास हांडगे आदी उपस्थित होते. इयत्ता बारावीत विशेष प्राविण्य मिळवलेल्या शिवानी कटाळे व वैष्णवी बोडके यांना बाराशे रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. इयत्ता दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तनुजा चौधरी, स्नेहा चव्हाण व नेहा बोडके यांना अनुक्रमे बाराशे व हजार रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी किरण भावसार यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली कविता ऐकवून आपले विचार प्रकट केले. प्राचार्य कलकत्ते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भावसार यांनी केले. सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका वैशाली रणदिवे यांनी केले. संदीप नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वाद्यवृंदाने स्वागत गीत सादर केले.
