
कंधाणे( प्रतिनिधी )– दरवर्षी नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे कविवर्य कुसुमाग्रज आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात, नाशिक जिल्ह्यातील एकूण ४५ उपक्रमशील शिक्षकांना जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे पुरस्कारदेण्यात आले असून, यात बागलाण तालुक्यातील तीन शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यामध्ये कंधाणे ता. बागलाण जिल्हा नाशिक येथील श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे संचलित विज्ञान जुनिअर कॉलेज कंधाणे येथील प्राचार्य पवन काकुळते यांना जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या मूळ गावी शिरवाडे वणी येथे भव्य अशा कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले. दरवर्षी जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे कविवर्य कुसुमाग्रज आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. हा पुरस्कार आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कादवा कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते ,दिलीप धारराव, शहाजी सोमवंशी, बापूसाहेब पाचोरकर, बापूसाहेब पाटील, सरपंच काळे, भाऊसाहेब भालेराव, राज्य शिक्षक नेते काळुजी बोरसे, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सलादे व त्यांची कार्यकारी मंडळ उपस्थित होते. प्राचार्य काकुळते यांना या अगोदर स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार व महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळालेले असून, त्यांनी केलेल्या कार्याची सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार तांबे यांनी कुसुमाग्रज आणि महाराष्ट्र यांचा स्नेहसंबंध उलगडत साहित्य क्षेत्रातील तारा हा आपल्या नाशिक जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रातील आहे याचा अभिमान असल्याचे सांगून, कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार हा उपक्रम शिक्षकांना खरंच प्रेरणादायी असून इतर शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजस्विनी कावळे, श्रीमती मीनाक्षी मोरे कु. सानिका खैरे यांनी केले तर आभार श्री सतीश सोनवणे व दिनकर रसाळ यांनी मांडले. प्राचार्य पवन काकुळते यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश दादाजी वाघ, संस्थेच्या अध्यक्ष वैशालीताई वाघ यांच्यासह बागलाण तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
