
अध्यक्ष भाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, सौ. आरती लाटणे, डाॅ. श्रीकांत पाटील, मेहबूब जमादार
*इचलकरंजी ( वार्ताहार ) निर्भिडता हा साहित्याचा आत्मा आहे, तो साहित्यिकांनी जपायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दि. बा. पाटील यांनी केले. येथील मुक्तसंवाद दीपावली विशेषांक आणि न्यू अथर्व पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २ र्या राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. सध्यस्थितीवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, ‘ लेखकाला सामाजिक समस्यांची जाण असायला हवी. ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचे प्रतिबिंब साहित्यात असायला हवे. माणसामाणसातील भेद कमी झाले पाहिजेत. राजकारणातील अधोगती, तरूणांची विवाहाची समस्या या घटनांवर साहित्यिकांनी परखडपणे लिहायला हवे. हिंदी – इंग्रजी भाषांच्या माध्यमातून मराठी भाषेवर होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी लोक जागर करायला हवा. साहित्य संमेलनात सौ. आरती अनिल लाटणे यांच्या ‘टेक आॅफ काशीयात्रा ‘ आणि सौ. शीला सतिशकुमार माने यांच्या देशी-विदेशी खेळांची रूपरेषा’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डाॅ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रकाशित पुस्तकांचा आढावा घेत नवोदितांना लेखनाची प्रेरणा दिली. यावेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १७ लेखक, कवी – कवयत्रींना साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कवी, प्रसिद्ध गझलकार विनायक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या ४० कवींनी सहभाग नोंदवला. प्रारंभी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार यांनी केले. मुक्तसंवाद दीपावली विशेषांकाचे संपादक विजय कांबळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मुक्तसंवादचे कार्यकारी संपादक एम.एस. जाधव यांनी संमेलनाचे आयोजन केले. त्यांना दीपावली विशेषांक कार्यकारी मंडळातील सदस्य शरद कुंभार, श्रीकांत येवलूसकर, साताप्पा सुतार, शिवाजी येडवान, कृष्णात कोरवी, सौ. वैशाली राऊत, कृष्णात करपे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संमेलनाचे सूत्रसंचालन देवदत्त कुंभार यांनी केले तर आभार विश्वास पाटील यांनी मानले.
