
पेठ वडगाव:(प्रतिनिधी )आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव येथील महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ०८ मार्च २०२५ रोजी ‘महिला सुरक्षा आणि कायदे’ या विषयावर अॅड. सीमा काशीद यांचे व्याख्यान महाविद्यालयात आयोजित केले होते. ०८ मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून देणारा दिवस आहे. भारतीय संविधानाने महिलांना अनेकविध कायद्यांचे संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यांचा उचित वापर करून महिलांनी स्वतःची प्रगती साधावी व आत्मनिर्भर व्हावे असे मत अॅड. सीमा काशीद यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांनी सर्वांनी कायद्याचे पालन करत असताना कायदा करण्यामागचा उद्देश लक्षात घेतल्यास सामाजिक स्वास्थ्य वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस.एस.अमृतसागर यांनी केले व आभार प्रा. अमृता जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजश्री पाटील यांनी केले. संस्थेच्या संचालिका आदरणीय प्रमिलाताई माने व संस्था सल्लागार मा. शशिकांत कसबेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभेच्या दिल्या. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
