
मनमाड, ता. १ : समाजातील मातांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते. मातांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत, त्यांना त्यांच्या संघर्ष आणि कष्टांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला दिनानिमित्त रविवार ९ मार्च रोजी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या महिला पत्रकार सदस्यांच्या वतीने “मातांचा सन्मान” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.”मातांचा सन्मान” हा कार्यक्रम छत्रे विद्यालयाच्या सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. पूनम राजपूत आणि येवला येथील भूमी अभिलेख विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तिलोत्तमा जोशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांना वैद्यकीय समस्यांबाबत तसेच शासकीय नोकरीत संधी या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहेत. खेळाडू व इतर मुलींच्या मातांचा सन्मान करणारा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खेळातील यशासाठी खेळाडूंच्या मातांचे अनमोल योगदान असते. त्यांनी आपल्या मुलींच्या कष्टांना समर्थन दिले आणि त्यांच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशा मातांना सन्मान देऊन त्यांचा आदर व्यक्त करणे, त्यांच्या कष्टांना सलाम करणे आणि त्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिनंदन करणे मातांच्या योगदानाची आणि कष्टांची कदर करत महिलांच्या शक्तीला, संघर्षाला आणि समर्पणाला सलाम करत समाजातील इतर महिलांसाठी एक आदर्श ठरेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिला पत्रकार सदस्यांनी “मातांचा सन्मान” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामुळे खेळाडू मुलींच्या मातांचा सन्मान होईल आणि त्यांचे कष्ट, त्यांचे समर्पण आणि योगदान समाजाच्या समोर आणले जाईल. “मातांचा सन्मान” कार्यक्रमात मातांना सन्मानचिन्ह, रोपटे आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या सहकोषाध्यक्षा रुपाली केदारे, कार्यकारणी सदस्या प्रिया परदेशी, दीपाली खरे, आम्रपाली वाघ, नैवेद्या बिदरी, स्वाती गुजराथी, प्रमिला उंबरे, हेमलता वाले, सारिका जेजुरकर, अस्मा इनामदार, मानसी देशपांडे, प्रियंका बोथरा, रेखा धिंगान, रीना शेकदार, रेखा मोरे, वैशाली मोरे, वर्षा गोयल, माधुरी वाघ, पूनम म्हस्के, मोनिका राजगिरे, माधुरी कदम, यांनी महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
