
नाशिक (प्रतिनिधी) : महिला ही केवळ समाजाचा एक भाग नाही, तर समाजाच्या उभारणीचा आधारस्तंभ आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा कर्तृत्ववान महिलांची प्रेरणा घेऊन आजच्या काळातील महिलांनी सक्षम व्हावे. आधुनिक विचारांची जोपासना करावी व आपण करत असलेल्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध करावे तसेच आपल्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्याही आरोग्याकडे लक्ष देऊन सुखी व आनंदी होऊन जगावे. तसेच समाजात प्रबोधनात्मक विचारांची जाणीव विकसित करावी. असे प्रतिपादन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लिलावती जयदेव ठाकूर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त विश्वास को-ऑप. बँकेतर्फे बँकेतील महिला वर्गासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.ठाकूर बोलत होते. विश्वास हब येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.

बँकेतर्फे महिला दिनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ.हर्षदा किरण निकम यांचे दातांच्या आरोग्याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. निकम यांनी दातांची निगा त्या संबंधीत आजार व उपचारा संदर्भात असलेले गैरसमज याबद्दलची माहिती अत्यंत साध्या सोप्या भाषेत प्रेझेंटेशन व व्याख्यानाद्वारे दिली. त्या म्हणाल्या उत्तम दात हे उत्तम व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. त्यासाठी त्याची काळजी घेणे म्हणजे मनाच्या व दाताच्या सौर्दयाची निगा राखणे होय. आरोग्य चांगले राहावे म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप महत्वाची आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित महिलांना भेट वस्तु देऊन सन्मानीत करण्यात आले. डॉ. हर्षदा निकम यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास बँकेच्या मुख्य कार्य. अधिकारी सौ. सारिका देशपांडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, महिलांनी कुठल्याही संकटाला सामारे जाण्यासाठी आपल्यात सामर्थ्य, धैर्य निर्माण करा, त्याच्यावर उपाय शोधा, आर्थिक स्थैर्य शोधा, स्वावलंबी बना. यावेळी बँकेचे अति. मुख्य कार्य. अधिकारी रमेश बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बँकेच्या जनसंपर्क अधिकारी सौ. मनिषा पगारे यांनी केले.
