
नाशिक:-(प्रतिनिधी )अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत सतत कष्टमय जीवन जगत घाम गाळून पिकवलेलं अन्न स्वस्तात विकून कसाबसा जगत असतो. त्याचं विदारक दुःख मांडणारी शेतकऱ्याच्या राबण्याची कविता ‘पोशिंदा’त आहे, असे प्रतिपादन पिंपळगाव बसवंत येथील कवी सोमनाथ पवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘पोशिंदा’ या काव्यसंग्रहावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सुनंदा पाटील होत्या. सोमनाथ पवार पुढे म्हणाले की, ‘पोशिंदा’ संग्रहातील कविता लयबद्ध आहे. कवितेची निर्मिती करीत असताना कवितेची लय आईने जात्यावर दळत असताना गायलेल्या ओवीत सापडली. ग्रामीण भागात बालपण गेल्याने तिथली समग्र परिस्थिती अनुभवताना कविता ही हक्काची सखी बनली. अनुभवलेल्या कष्टातून आणि ग्रामजीवनातल्या विविध प्रथा-परंपरांतून कविता निर्माण झाल्या, असे सांगून त्यांनी काव्यसंग्रहातील काही कवितांचे उत्तमपणे सादरीकरण केले. ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे आणि प्रा.नामदेव जाधव या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. कविता कासार यांनी सूत्रसंचालन केले तर मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (१७) डॉ.सुरेखा जाधव ह्या ‘नि:स्पृह साधक’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
