
नाशिक:- (प्रतिनिधी ) कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. ती समाजाभिमुख असल्याने साऱ्या समाजाचे प्रश्न, सुख, दुःख घेऊनच ती वाचकांपुढे येत असते. कवीकडे विचारांचं भांडवल असल्याशिवाय नवे विचार सापडत नाहीत. कारण काळजात जपलेली उलघाल म्हणजे कविता असते, असे प्रतिपादन जनार्दन देवरे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘अंतर्दाह’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ होते.
जनार्दन देवरे पुढे म्हणाले की, प्रतिभासंपन्न कवीने सारेच काव्यप्रकार हाताळायला हवेत. लोककवी विठ्ठल वाघ, खलील मोमीन, प्रा.गो.तु.पाटील, आनंद जोर्वेकर, उत्तम कांबळे, अरुण काळे अशा ज्येष्ठ साहित्यिकांच्या मार्गदर्शनातून माझा ‘अंतर्दाह’हा काव्यसंग्रह घडत गेला. १९९८च्या दरम्यान सुरू झालेला ‘अंतर्दाह’चा प्रवास २००४ मध्ये प्रकाशित झाल्याने संपन्न झाला, असे सांगून त्यांनी ‘अंतर्दाह’या काव्यसंग्रहातील काही कवितांचे सादरीकरणही केले.
संजय गोराडे आणि आकाश पवार या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यानी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ साखरे यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या मंगळवारी (१०) हंसराज देसाई आपल्या ‘बुरुज मनाचे बांधा’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
