
नाशिक ( प्रतिनिधी)– मालेगाव तालुक्यातील मुळचे चिंचावड गावातील राहणारे मात्र रोजगारा निमीत्ताने नाशिक येथे स्थायिक झालेल्या नागरिकांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावाबाहेर राहूनसुद्धा आपापसातील नाळ घट्ट ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे ६५ रहिवाशांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ज्येष्ठांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतीक बच्छाव यांनी केले. यामध्ये चिंचावड वासी नाशिक रहिवाशी या कार्यक्रमाचा खरोखर आयोजकांचा उद्देश काय होता याचे सविस्तर वर्णन त्यांनी प्रास्ताविकात केले. एकाच शहरात राहून सुद्धा बर्याच लोकांना आपण ओळखत सुध्दा नाही, ही तोंडओळख होणे गरजेचे आहे हेही त्यांनी विषद केले.सूत्रसंचालन प्रा. राजेशजी बेदमुथा यांनी आपल्या तूफान हास्य विनोदाने केले. चौफेर फटकेबाजी करत उपस्थितांना जवळपास तिन तास बेदमुथा यांनी खिळवून ठेवले प्रत्येकाचा परिचय झाल्यानंतर मध्येमध्ये गावातील गंमतीजमती, लहानपणी चे आयुष्य कसे होते, नवनविन किस्से त्यांनी आपल्या शैलित ऐकल्यामुळे उपस्थित अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. यावेळी सर्व उपस्थितांनी आपली ओळख करून देत आपण नाशिक मध्ये कधी आलो, व्यवसाय व परिवाराविषयी ओळख करुन दिली व आपापली मनोगते व्यक्त केली. आणी प्रत्येकाने आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले. यानिमित्ताने सर्वांची ओळख होऊन पुढे आयुष्यात शैक्षणिक, सामाजिक, व्यवहारीक आणी सुख-दुःखात एकमेकांना नक्कीच मदत होईल असे मत उपस्थितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आलेल्या प्रत्येकाचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले आणी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. शेवटी आभार प्रा. प्रतीक बच्छाव यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्रजी चव्हाण, प्रा. राजेशजी बेदमुथा, प्रा. प्रतीक बच्छाव, जशवंत पाटील, साहेबराव पवार, अमृत पवार व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
