
नासाका विद्यालयात अधिकारी पदांवर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुणे कवी शरद आडके, मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी आदींसह शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- माता-पित्यांचे अपार कष्ट आणि गुरुजनांची शिकवण यांचे संस्कार घेत आपण घडत असतो. जीवनात यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर सातत्याने परिश्रम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी राजेश रुद्रे यांनी केले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात विविध पदांवर नियुक्त झालेल्या माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यात सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. मंचावर सन्मानार्थी विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुणे कवी शरद आडके, श्रीमती बकुळाबाई रुद्रे, चंद्रभान गायधनी, दिलीप ठुबे, सुरेश शिरोळे, मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी, लहू पूर्णे, नवनाथ होगाडे आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी आणि सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी राजेश रुद्रे यांच्यासह विविध पदांवर निवड झालेल्या समाधान ठुबे (नौदल), संदीप शिरोळे (पोलीस), प्रवीण गायधनी (केंद्रीय सुरक्षा बल), विजय रुद्रे (पोलीस) या गुणवंतांचा विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी गुणवंतांनी आपल्या यशात विद्यालयातील गुरुजन आणि आपल्या परिवाराचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. कवी शरद आडके आणि मुख्याध्यापक अरुण पगार यांनीही गुणवंतांचे कौतुक केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
