लेखिका:- ॳॅड. अर्चना धवलचंद्र आढाव

रोज लुटली जाते इथे रस्त्यावर इज्जत महिलेची अन आम्ही गातोय समारंभात महिती महिला दिनाची वर्षांनुवर्षे निर्भया माझी न्यायासाठी लढते आहे न्यायदेवता माझ्या देशाची आरोपीला संधी देते आहे येता जाता भरचौकात होतो तिचा विनयभंग आम्ही मात्र समारंभात हारतुरे घेण्यात दंग शेजारी नातेवाईक भाऊ अन बापही अत्याचार पोरीवर करतो आहे आजची नारी सक्षम किती यावरच भाषण झोडतो आहे जेंव्हा मायबहीण आपलीनिर्भयपणे रस्त्यावर फिरेल याची तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. आज रोजी महाराष्ट्रात नव्हेतर देशभरात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते, मुली महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. शेजारच्या मुलीवर , बस मध्ये शाळा कॉलेजात कार्यालयात स्त्रियांवर असे प्रसंग होतात तेव्हा आपण काय करतो ? आपण गप्प राहणाऱ्यांमध्ये असतो आणि एवढे सगळे होऊनही जी लोक आपला वारसा सांगण्याचे दीखाऊपणा करतात, आपले नाव मिरवतात वेगवेगळे कायदे बनवण्याचे, बदलण्याचे , अमलात आणण्याची भाषा करतात ते या विषयांवर काय करत आहेत? प्रत्यक्षात गुन्हेगारास शिक्षा होते का ? की गुन्हेगार जितका मोठा असेल तितक्या लवकर तो निर्दोष सुटतो? अहो आज रोजी याहीपेक्षा भीषण परिस्थिती की शासन वगैरे तर सोडाच पण साधा गुन्हा सुद्धा नोंदवला जात नाही आणि यामुळेच त्या गोष्टी पासून प्रेरणा (च म्हणा) घेऊन इतर लोक ही असे गुन्हे करतात. कारण त्यांना माहीत आहे की आपल्याला कोणतीही शिक्षा होणार नाही. आणि मग “हे स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा “ असे मानून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी तरी या गुन्हेगारांना माफ केले असते का ? अहो आज जर शिव छत्रपती अवतरले तर चौकाचौकातील त्यांचे भव्य दिव्य पुतळे बघून, ढोल ताशात काढलेली मिरवणूक बघून नक्कीच खुश होणार नाहीत. आपल्यासाठी आज ही प्राण पणास लावणारे फेटे बांधणारे मावळे बघून नक्कीच महाराजांचे मन विषण्ण होईल. अहो महाराजांनी आदर्श स्वराज्याची घडी बसवताना नेहमीच रयतेच्या हिताला प्राथमिक दर्जा दिला, महिलांचा सन्मान केला, नुसतेच स्वराज्यातील स्त्रियांची पाठराखण केली नाही तर शत्रू पक्षातील स्त्रियांचंही यथायोग्य आदर करून सन्मानाने वागवले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांस तर त्यांनी कधीच पाठीशी घातले नाही. त्यांच्या राज्यात बलात्काराच्या गुन्ह्या साठी त्या व्यक्तीचे हात कोपरांपासून आणि पाय गुडघ्या पासून कलम करण्याची शिक्षा असे. या शिक्षेला चौरंग शिक्षा म्हणत. हात पाय कलम केल्यावर रक्ताहानी होऊन ती व्यक्ति मृत्यू पाऊ नये म्हणून यासाठी गरम तेलात किंवा तुपात त्या जखमा तळल्या जायच्या त्यामुळे नसा बंद होऊन रक्तस्त्राव थांबायचा आणि तो व्यक्ति मरत नव्हता आणि या व्यक्तीला दररोज गावाच्या वेशी वर इतर लोक घेऊन येत आणि तिथे बसवत म्हणजे त्याला बघून कुणीही पुढे हे दुष्कर्म करणार नाही आणि सर्वांसाठी हे एक उदाहरण असेल . हे करत असताना त्यांनी आपल्या मेहुण्यालाही सोडले नाही. त्याचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन त्यास आयुष्यभर तुरुंगात डांबले.आमच्या माँसाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो अशा शब्दात एका मुस्लिम स्त्रीचा आदर करणारे जिजाऊ पुत्र गोरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृतीनुसार स्त्रीचा आदर कसा करावा हे आपल्या कर्तुत्वाने जनतेला करायला शिकवले. येथे माता जिजाऊ साठी हे उदाहरण लागू होते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्रीचा हात असतो आपण कथेमध्ये ऐकले सुद्धा आहे की सावित्री ने सत्यवानाचा प्राण जीवन पुन्हा प्राप्त केले होते त्याचप्रमाणे आपल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजसेवेला हातभार लावून मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये काढून इतिहास घडवला यामध्ये झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर ही अशा कार्यात पुढेच आहेत. तसेच आपल्या जीवनाची आहुती देणारी आधुनिक युगाची सावित्री माता रमाई आपल्या मुलाची प्राणज्योत मालवली असता त्यांच्या कफनासाठी पैसे नसताना आपल्या दांडाच्या लुगड्याच्या कपड्याचे कफन बनवणाऱ्या माता रमाई शेणाच्या गौऱ्या विकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर बनवणाऱ्या रमाईचा यशस्वी भारताच्या घटनेचे शिल्पकार होण्यास माता रमाईचा हा मोठा हात होता. रमाईच्या गौऱ्या थापणारे हात भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या हाताची साथ देत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बापमाणूस म्हणून देऊन गेले यापेक्षा मोठे उदाहरण जगात असू शकत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे रत्री चा हात असतो. परंतु हे आज कुठेच होताना दिसत नाही कुठे बदलापूर हत्याकांड तर कुठे निर्भया हत्याकांड कुठे स्वारगेट येथील बलात्कार तर कोलकत्यात डॉक्टर हत्याकांड. तर सध्या गाजत असलेले हरियानातील रोहटक येथील कॉंग्रेस कार्यकर्ती हिमाणी नरवाल हत्याकांड असेल . गौरव संस्कृती, संत संस्कृती , वारकरी संस्कृती असणाऱ्या भारतामध्ये काय घडत आहे या यासाठी राज्यघटनेतील कलम अधिक कडक करावे लागतील.भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करता येत नाही. संविधानांने पुरुष व स्त्रीला समानहक्क व अधिकार दिलेले आहेत. पंरतु,कधी कधी योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे महिला त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून आजही वंचित राहताना दिसतात. स्त्रीया आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून देशाला प्रगतिपथावर नेण्याची जबाबदारी पार पाडत आहे. तरीही स्त्रीवर्ग आजही देशात असुरक्षित आहे. रोजच महिला-मुलींवर वाढते अत्याचार हत्यासत्र, स्त्रीभ्रूण हत्या असे रोजच घडत आहे.महिलांसाठी भारतीय संविधान आणि विविध कायद्यानुसार विशेष संरक्षण कलमे अस्तित्वात आहेत. या कलमांचा उद्देश महिलांना शारीरिक, मानसिक, आणि आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे आहे. यातील काही महत्त्वाचे कलमे खालीलप्रमाणे आहेत:भारतीय संविधानाचा कलम १५ – हे कलम महिलांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे भेदभाव करणारा कायदा किंवा प्रथा प्रतिबंधित करते. यामध्ये महिलांना समान अधिकार आणि संधी देण्याचा वचन दिला जातो.भारतीय दंडसंहिता (IPC) – महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांसाठी भारतीय दंडसंहितेमध्ये विविध कलमे आहेत, जसे की:कलम ३७५: बलात्काराचा प्रतिबंध.कलम ३५४: महिलांच्या मानहानीचा आणि लज्जा उत्पन्न करण्याचा कायदा.कलम ५०६: धमकी देण्याचा आणि महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्याचा प्रतिबंध.हुंडा प्रतिबंधक कायदा – हुंडा घेणे आणि देणे चुकीचे आहे. महिलांना हुंड्याचा आडून शोषण होण्यापासून संरक्षण प्रदान करणारा हा कायदा आहे.महिला अत्याचार संरक्षण कायदा, २००५ (Protection of Women from Domestic Violence Act) – हा कायदा महिलांना घरातल्या हिंसाचारापासून संरक्षण प्रदान करतो आणि त्यांना मदत मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.वर्क प्लेस सेक्सुअल हॅरेसमेंट कायदा (Sexual Harassment of Women at Workplace Act, 2013) – महिलांना कामाच्या ठिकाणी शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळापासून संरक्षण देणारा कायदा आहे.बालिका संरक्षण कायदा – बालिका वयात त्यांना विविध प्रकारच्या हिंसाचारापासून आणि शोषणापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा कायदा लागू आहे.या सर्व कलमांद्वारे महिलांसाठी विविध स्तरावर संरक्षण दिले जाते, आणि त्यांना त्यांच्या अधिकारांचा उपयोग करण्याची संधी प्राप्त होते.आई हाच पहिला गुरू असं म्हणतात हे शिवाजी आणि जिजाऊच्या बाबतीत तंतोतंत खरे होते.आणि म्हणूनच आजच्या आईनेच आपल्या मुलांना संस्कार देण्यासह चांगले विचार, शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन जर केले तर नक्कीच अनेक शिवाजी राजे घडू शकतीलशेवटी एव्हढेचज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,तो जिजाऊचा शिवबा झाला,ज्याला स्त्री ‘बहिण म्हणून कळलीतो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली,तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,तो सीतेचा राम झाला.
