
अवकाश निरीक्षण करताना विद्यार्थी व मार्गदर्शक प्रा. दीपक नाठे , प्रशांत निखाळे व शिक्षकवृंद
काचुर्ली (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान आणि खगोलशास्त्राबद्दल कुतूहल निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष अवकाश दर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

विद्यार्थ्यांना अंतराळातील विविध गोष्टींची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशातून मविप्रचे माजी विद्यार्थी सातत्याने उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार(दि. ४ ) रात्री ७ ते ९ वाजे दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत अवकाश सफरीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना दुर्बिणीच्या सहाय्याने शुक्र, गुरू आणि त्याचे उपग्रह आणि चंद्र अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. अंतराळातील विविध ग्रह, त्यांची नावे, आकार आणि तारे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.दीपक नाठे यांनी दिली. तसेच त्यांच्या शंकांचेदेखील निरसन करण्यात आले.

कार्यक्रमातील विशेष क्षण असे…
- गुरू ग्रहाचे दर्शन : दुर्बिणीच्या मदतीने विद्यार्थ्यांनी शुक्र ग्रह आणि त्याचे उपग्रह जवळून पाहिले, ज्यामुळे त्यांना अंतराळातील अदभूत दृश्यांचा अनुभव आला.
•चंद्राचे दर्शन- चंद्राचे जवळून निरीक्षण करता आले.ज्ञानवर्धक प्रश्नमंजूषा: खगोलशास्त्रावर आधारित जलद प्रश्नमंजुषा घेण्यात आली,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खगोलशास्त्र विषयी ज्ञानात भर पडली.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अंतराळाबद्दलची त्यांची उत्सुकता दिसून आली.
यावेळी मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे प्रशांत निखाळे, शिक्षक नवनाथ ठाकरे, तुषार पवार, हेमंत इंपाळ,अधीक्षक अविनाश भिसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
