
शहापूर (प्रतिनिधी आशा रणखांबे ) सामजिक जनजागृती होऊन परिवर्तन व्हावे बाहेरील व जास्तीत जास्त शहापूरमधील कवींना संधी कवी संमेलनाद्वारे मिळावी म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने धर्मवीर आनंद दिघे विद्यालय शहापूर येथे समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून कवी कांतिलाल भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलनाचे पहिले सत्र संपन्न झाले . कवितेमध्ये खूप ताकद असते,

छोट्या कवितेमध्ये खूप मोठा आशय सामावलेला असतो आणि सर्व कवींच्या कविता छान होत्या असे कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आपले प्रतिपादन केले. यावेळी कवी संमेलनात संघर्षकार नवनाथ रणखांबे , जगदीश घनघाव , विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, शाम बैसाणे, मनिषा मेश्राम , प्रतिक भडांगे, देवभाऊ उबाळे , संघरत्न घनघाव, सुचिता बागडे खाडे आदी . एकूण २७ निमंत्रित कवींच्या कवितांचे बहारदार सादरीकरण झाले. शहरी आणि ग्रामीण भागातूनही कवि आणि श्रोते उपस्थित होते. कवींना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दुसऱ्या व्याख्यान सत्रात व्याख्याते ग वि खाडे विद्यालयाचे प्रा. दिगंबर खरात यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातील कवींना संधी दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. व पी डी कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ येथील प्रा. संजय निचिते यांनी मराठीला भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला हे सांगून कवींनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत असे यावेळी बोलतांना मत व्यक्त केले. कार्यक्रमांचे व संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे यांनी यावेळी कवी जेव्हा कवितेला जन्माला घालतो तेव्हा तो तिचा बाप असतो तर कवितेमुळे कवी मोठा होतो तेव्हा ती त्याची आई होते असे मत मांडून संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या कार्याचा आणि संस्थेच्या पुढील वाटचालीचा आढावा आपल्या भाषणात घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यकांत भडांगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार बाळाराम वाढविंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार उबाळे, कांतिलाल भडांगे , रामदास भोईर, सूर्यकांत भडांगे, अनंत सोनावणे, बाळाराम वाढविंदे यांनी मेहनत घेतली.

