
*कविता नाशिक:-(प्रतिनिधी )डोंगरदऱ्यांमधला समृद्ध निसर्ग मी बालपणापासून अनुभवला आहे. निसर्गासह या परिसरातील अभावग्रस्तता हासुद्धा माझ्या कवितेचा विषय आहे. कविता हा माझा श्वास आहे. या कवितांनी निसर्ग वाचता आला, असे विचार रानकवी तुकाराम धांडे यांनी मांडले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवानिमित्त हुतात्मा स्मारकात ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘वळीव’ या पुस्तकावर धांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते. कवी धांडे पुढे म्हणाले की, प्रत्येक माणसाने पंचमहाभूते समजून निसर्ग आणि भूगोल वाचवला पाहिजे. निसर्ग समजून घेण्यासाठी आपण सक्षम झालो पाहिजे. निसर्गाची गोडी लावणारी रानवेडी ही कविता बालमनावर वेगळी ओळख निर्माण करून गेली. वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी माझ्या मौखिक कवितांना पुस्तकातून आकार दिला.मातीपासून, निसर्गापासून निर्माण झालेली माणसं समजून घेतली पाहिजे. निसर्गाने मला भरभरून दिले, असे सांगून संग्रहातील रसिकमान्य कविता त्यांनी सादर केल्या. प्रा.वंदना रकिबे आणि किरण मेतकर यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर संजय आहेर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.७) वाळू आहेर ‘अंतरीचे बोल’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
