परीक्षण–विद्या दौलत सरपाते पोलीस पाटील गुंजखेड ,ता.लोणार,जि.बुलढाणा९३०९७४३२४६

बोधात्मक कथासंग्रह म्हणजेच युद्ध लिपीवाचकांना जवळचा वाटणारा वाड्.मयप्रकार म्हणजे कथा… कुठल्याही वयाच्या वाचकांना कथा नेहमीच आकर्षित करतात. कथा ह्या आत्मबल वाढवणाऱ्या आणि प्रेरणादायीच असतात.अनेक कादंबऱ्या, कविता ,नभोनाट्यं आणि वैविध्यपूर्ण लेखांच्या घवघवीत यशानंतर_ इतक्यात प्रकाशित झालेला विलास अंभोरे सरांचा “युद्धलिपी” हा कथासंग्रह.अर्थातच अंभोरे सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या कथा ह्या समृद्ध भूमीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवत आहेत.ते स्वतः बेघर असले तरीही त्यांच्या कथा मात्र मनांत घर करतील अशाच आहेत.त्यांच साहित्य दालन समृद्ध, सुजलाम् सुफलाम् आहे. अनुभवसमृद्ध आहे.शिवाय कथा ह्या काल्पनिक कुंचल्यातून रंगवलेल्या नाहीत.त्या मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या नाहीत.त्यांची भाषा समृद्ध आहे.त्यांचं आयुष्य हे स्वप्नातल्या कथेपेक्षा कमी नाही.त्यांनी जे भोगलं तोच त्यांच्या साहित्याचा विषय आहे.त्यांच्या कथा ह्या खाचखळग्यांनी भरलेल्या आहेत;पण त्यात मिरची मसाला नाही.जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या आहेत.अंधारात राहून उजेड पसरवणाऱ्या आहेत.वास्तववादी , हुंकार गोठवणाऱ्या ,मनाला अस्वस्थ करणाऱ्या कथा आहेत.विषेश उल्लेखनिय बाब म्हणजे संपूर्ण कथा ह्या स्त्रीप्रधान आहेत.एकूण पंधरा कथांपैकी पुस्तकाचे शीर्षककथा असणारी “युद्ध लिपी”म्हणजे काहीतरी वेगळंच.युद्ध म्हणजेच संघर्ष! आणि संघर्षाशिवाय आयुष्य आणि लेखणी अर्थहीन असते.लिपी म्हणजे भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी चिन्हं.आपण आतापर्यंत रोमन, देवनागरी,खरोष्टी,चिनी,अरबी ह्या लिप्या अभ्यासल्या होत्या.पण लेखकाच्या मुरुमाड,बरड डोक्यातून उतरलेली युद्धलिपी ही पहिल्यांदाच अभ्यासणार आहोत.वाचणार आहोत आणि त्या लिपीनं युद्ध करून जिंकणार आहोत.या लिपी द्वारे ज्ञान आणि माहिती पुढच्या पिढीला देणार आहोत.साधारणपणे युद्ध म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो रक्तपात,मुडद्यांचा खच, गोळीबार, अणुस्फोट, आक्रोश,आकांत.पण कथेत मात्र आहे ते वेगळंच आणि तेही अस्वस्थ करणारं.युद्ध ही अनेक प्रकारची असतात.सायबर युद्ध, शीतयुद्ध, टोळीयुद्ध.युद्ध ही सत्तेसाठी, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक भेदासाठी, मानवाधिकारासाठी केली जातात.प्रत्यक्ष किंवा दबाव तंत्राचा वापर करून.आधुनिक काळातील आधुनिक साहित्यिक विलास अंभोरे मात्र अक्षर आणि अंकाचा वापर करून कोणाविरुद्ध युद्ध करणार ते कळण्यासाठी युद्ध लिपी हा कथासंग्रह वाचावा लागेल.प्रत्येक कथा ही मनावर खोलवर घाव घालणारी, अंतर्मुख करणारी आहे.जगण्यासाठी प्रेरीत करणारी आणि माणसाला माणूस बनवणारी पुस्तकं यांची महती अधोरेखित करणारी कथा म्हणजे रद्दी! मुलीच्या आजारपणासाठी घरातील बहुमूल्य पुस्तकं विकणारी आई वाचताना शब्दांवर आभाळ गळायला लागते ,तर तीच पुस्तकं रद्दीत घेऊन वाचनालय सुरू करणारा दुकानदार अंतर्मनात माणूसकीची बीजं पेरतो.त्या कथेतील काही संवाद मी येथे उद्धृत करु इच्छिते:’कशासाठी विकली रद्दी ‘?’पोरगी बिमार हाये.मी जित्ती असल्यावर तिले कसं मरु देता येईल!मी काय म्हणतो,मी खूपच बदमाष म्हणून कुप्रसिद्ध होतो…पिसाळलेलं जनावर!मला माणसांत माणूस बनवून आणलं पुस्तकांनी!वाचनालय सुरू करणार आहे मी.मला तुमची सर्वच पुस्तक द्या.त्याची पूर्ण किंमत देणार तुम्हाला.आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अवलोकन लेखकाने भूमिका, रद्दी,माती,लाली, संस्कृती अशा विविध कथांमधून केलं आहे.हल्ली तर अफवांचं पेवच फुटलं आहे.अफवांमुळं सामाजिक ताणतणाव निर्माण होऊन दंगली पेटतात आणि त्यात निष्पांपाचा हकनाक बळी जातो.कायदा व सुव्यवस्था ढासळते.अफवा ह्या कथेत भाव खाऊन जाते ती सत्याच्या बाजूनं उभी राहणारी पिएस आय आणि सत्य, अहिंसा,करुणेची शिकवण देणारा बोधीवृक्ष! ही भूमी बुद्धाची भूमी आहे.या मातीत शांततेची,समतेची बीजं खोलवर रुजलेली आहेत.हे जग बुद्ध तत्त्वज्ञानावर चालतो.इथे असत्य हे चिरकाल टिकणारं नाही.अंधारातून प्रकाशाकडे नेणारे पिंपळ वृक्ष दारोदारी असायला हवेत हेच त्या कथेचे सार आहे.प्रत्येक कथा ही सध्यस्थितीला अनुसरून आहे.समाजाला एक संदेश देणारी आहे.ती माणसाला जगणं शिकवते.इथल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठणारी आहे.तिच्या बुडालाच आग लावणारी आहे आणि याचा प्रत्यय भूमिका कथा वाचताना शब्दोशब्दी येतो.प्रत्येक शब्द माणुसकी गोठवणारा , अंतरंग हादरवून सोडणारा आहे.कथा ह्या समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आहेत.प्रत्येक पात्र हे सध्या प्रत्येक कथा जगत आहे.भोगत आहे. कथा वाचताना सध्या ज्या घटना घडत आहेत त्या हुबेहूब डोळ्यासमोर उभ्या राहतात.आणि त्या उभ्या करण्याची प्रचंड ताकद अंभोरे सरांच्या सिद्धहस्त लेखणीत आहे.असा लेखकच होणे नाही.त्यांची परिभाषा वेगळी आहे.त्यांचा शब्द छिन्नीहातोड्यासारखा घाव घालणारा असाच आहे.बुद्धाच्या विचारांना जीवंत ठेवणारा आहे.धगधगत्या जीवनाचं प्रतिबिंब त्यात वाचकाला त्यात दिसते.भूमिका ह्या कथेतील सीमा गावोगावी पहायला मिळते.खरे गुन्हेगार हे मोकाटच फिरत असतात.पण निर्दोष व्यक्तीच्या गुन्हेगारीची झळ त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते.नवरा गुन्हेगार म्हणून वाळीत टाकलेली सीमा ज्यावेळी मुलाचा अंतिम संस्कार एकटी करते तेव्हा इथलं मातृत्व नक्कीच अश्रूनं भिजते.पण ते सामाजिक परंपरेपुढं हतबल,पांगळं आहे.पण ते बंद दाराआड आतल्या आत आंक्रंदत असेल.तेव्हा इथल्या व्यवस्थेला जाळून टाकण्याची जी भूमिका घेते ती समाजातील पिडीत,शोषीत, वंचीत स्त्रीला प्रेरणा देणारी आहे.ती अन्यायाविरुद्ध बंड करायला शिकवते.ती पेटून उठून तिच्या झोपडीला आग लावते.ती तिचं नुसतं घर जाळत नाही तर इथली व्यवस्था भस्मसात करून टाकते.व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ती तिची ठामपणे भूमिका घेते.प्रत्येक स्त्रीनं स्वतःला जाळून संपवण्यापेक्षा अशाच भूमिका घेऊन व्यवस्था जाळली पाहिजेत.परिस्थितीपुढं न झुकता तिलाच झुकवलं पाहिजे सभोवतालचा परिसर समाजातील विविध प्रकारची माणसं त्यांची विचारसरणी, संस्कृती, वर्तन शैली यावर चिंतन,मनन करून त्यावर भाष्य करण्याची प्रचंड ताकद त्यांच्याजवळ असल्यानं आणि इथल्या व्यवस्थेशी, परिस्थितीशी, सर्वप्रकारच्या व्याधींशी युद्ध करून ती जिंकत आल्यानं त्यांच्याकडून दर्जेदार कथालेखन झालेलं आहे.वाचनमग्न होत असताना आपण त्या कथा समोरच पडद्यावर अनुभवत आहोत की काय याची अनुभूती येते.कथा आणि साहित्य म्हणजे नेमकं काय हे ह्या कथा वाचल्यानंतर लक्षात येते.प्राध्यापक नंदू वानखडे यांच्या कुंचल्यातून उतरलेलं आकर्षक मुखपृष्ठ असलेला युद्धलिपी हा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केलाय.तो प्रत्येकाच्या घरात संग्रही असायलाच हवा. आतापर्यंत माझ्या वाचनात अशा कालसुसंगत कथा आलेल्या नव्हत्या.जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अंभोरे सरांच्या साहित्यावर लिहिण्याची पात्रता नसताना,मला भावलेल्या कथासंग्रहावर लिहिण्याचा मी केलेला केविलवाणा प्रयत्न समजा.मी समीक्षक नाही.मात्र वाचक आहे.प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी शाळा-महाविद्यालयाची गरज असते असे नाही,तर आपल्या आयुष्यात आलेले अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात.आणि त्याच अनुभवांनी लेखकाला वेगळा दृष्टिकोन दिला.समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनांकडे पाहणारी त्यांची दृष्टी ही केवळ निरीक्षण करणारी नव्हे,तर त्यातून शिकणारी आणि समाजाला दिशा देणारी आहे.समाजाला अशा पुस्तकांची नितांत गरज आहे, म्हणून सरांच्या हातून भविष्यात अशीच दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहो हीच सदिच्छा!कथासंग्रह –युद्धलिपीकथाकार -विलास अंभोरे (९६५७३१३८६४)प्रकाशन-ग्रंथाली प्रकाशन मुंबई मुखपृष्ठ -नंदू वानखेडेपृष्ठ संख्या -१६८किंमत-२५०
