
सिन्नर ( प्रतिनिधी)
अंबाड्याला तुझ्या, मोगऱ्याचा वासप्रिये
तुझ्यात होई, मला चंद्राचा भास
कवी मोहन वाकचौरे यांच्या प्रेम कवितेने कवितेची संध्याकाळ गंधित झाली. एकापेक्षा एक बहारदार कवितांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सिन्नर शाखेने , सिन्नर सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेली लोककवी वामनदादा कर्डक कवी कट्ट्यावरील काव्यमैफील रंगतदार होत गेली. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष प्राध्यापक राजाराम मुंगसे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एस जी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक उदय कुदळे उपस्थित होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे प्रतिमापूजन आणि वटवृक्षाला पाणी घालून या मैफिलीची आगळीवेगळी सुरुवात करण्यात आली. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा फुले यांच्या होत असलेल्या स्मारकाविषयी गौरव उदगार काढत कवी देव थोरात यांनी फुले दांपत्याने भिडे वाड्यात सुरू केलेल्या स्त्री शिक्षण चळवळीला आपल्या कवितेत गुंफले.
“जिथे ओढला गेला होता स्त्रीशिक्षणाचा पहिला गाडा तोच मी साऊ ज्योतीबाचालाडका भिडे वाडा”
शेतकरी आत्महत्या, काव्य निर्मिती मागील प्रेरणा, निसर्ग, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, आधी विविध विषयांवरील कविता या कवी संमेलनात सादर करण्यात आल्या. वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी आजकालच्या सावित्रींनी वडाला फेऱ्या मारण्याऐवजी वटवृक्षाचे जतन करणे त्याची लागवड करणे किती आवश्यक आहे हे आपल्या कवितेतून मांडले. “कलियुगातील सावित्रींनो सात जन्म तोच नवरा मिळो वा ना मिळो याच जन्मात जगवा वडाचे वृक्ष सात”
कविता ही कविता जगण्याचा श्वास असते, जगण्याचे बळ देते हे अधोरेखित करताना कवयित्री सुनिता सानप आपल्या कवितेत म्हणाल्या,
“निरामय मुक्या भावनांना तूच देतेस सादउमटतात शब्दांतभावभावनांचे पडसाद”
युवा कवी जालिंदर डावरे यांनी शेती मातीचे दुःख वेदना आपल्या कवितेतून प्रभावी शब्दात मांडल्या. शेतकऱ्यांची मुले जेव्हा लिहू लागली तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांना शब्द मिळाले जालिंदर डावरे आपल्या कवितेत म्हणतात,
“झाड लागलंय रडू पानं गळून पडली गेला गावात सांगावा नाळ मृत्यूशी जडली”
या पुढील काळात दर महिन्याला लोककवी वामनदादा कर्डक कवी कट्ट्यावर कवी संमेलनाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती प्रास्ताविका मसापाचे कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे यांनी दिली. कवी संमेलनात मनीषा उगले, रवींद्र कांगणे, प्राध्यापक राजाराम मुंगसे, कवयित्री सुनिता वाळुंज, रोहिणी मिठे, किरण भावसार आदींनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन देव थोरात यांनी केले. वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी आभार मानले.
