
नांदगाव : (मारुती जगधने)दि. १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी व्हावी यासाठी नांदगाव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक समाजसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला व त्यांच्या विचारांना अनुसरून समाजात एकोपा आणि बंधुभाव निर्माण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. जयंतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून योग्य ती तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.बैठकीत शांतता समिती सदस्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले व कायदा-सुव्यवस्थेच्या पालनासाठी सर्वांनी संयम पाळावा असे ठरवले. मिरवणुका, कीर्तन, भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करताना पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले.या बैठकीमुळे समाजातील सर्व घटकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले असून, बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपस्थित होते यावेळी शहरातील पोलीस प्रशासन पत्रकार वकील विविध मंडळे सामाजिक कार्यकर्ते शांतता समिती सदस्य नगरपालिका प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते बैठक शांततेत पार पाडली.
