
नाशिक :(प्रतिनिधी )ना.जि.मविप्र समाज निवृत्त सेवक संघाचा सन २०११-१२ पासून प्रलंबित असलेला फेरफार अर्ज अखेर मे. धर्मदाय उप आयुक्त, नाशिक यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे संघाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने सभासदांना दिलेला शब्द पूर्ण करून महत्त्वाचे यश संपादन केले आहे.
सदर मंजुरीसाठी संघाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. या कामात संघाचे माजी पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय ॲड. यु. आर. जाधव यांचे कायदेशीर मार्गदर्शन व वकिली, तसेच श्री तिडके बाबा यांचे संगणकीय ज्ञान आणि सहकार्य यामुळे ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होऊ शकली.
संघाचे सचिव कवी माणिकराव वि. गोडसे यांनी सांगितले की, विद्यमान कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांनी अतिरिक्त वेळ देऊन व समन्वय साधून हे काम पूर्णत्वास नेले. यासाठी मातृ संस्थेचे विद्यमान कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, प्राचार्य तसेच सर्व संबंधितांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यापुढील काळातही संघाच्या विविध उपक्रमांसाठी सर्वांचे असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
– कवी माणिकराव वि. गोडसे
सचिव, ना.जि.मविप्र समाज निवृत्त सेवक संघ
