
पैशाचा लोभ, निष्काळजीपणा, आणि अतिउत्साह यातून घडलेली महा शोकांतिका..
देशाला हादरवणारी दुःखद घटना गोव्यात घडली आहे. पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेल्या गोव्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी एक बोट बुडून मोठी जीवितहानी झाली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, ४० जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
आणखी ६४ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे बेपत्ता व्यक्तींसाठी बचाव पथके मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत.
समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेने स्थानिक, पर्यटक आणि अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
घटना घडताच तटरक्षक दल, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य वेगाने सुरू केले.
समुद्राच्या लाटा आणि प्रतिकूल हवामान असतानाही बेपत्ता व्यक्तींचा शोध अखंड सुरू आहे.
प्राथमिक तपासात बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढवणे हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
जास्त नफ्यासाठी बोट मालकाने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून जास्त लोकांना समुद्रात फेरफटका मारायला नेले होते.
