
‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘अरुणोदय’ कादंबरीचे उलगडले विश्व!
नाशिक:- आज आपण एआय, फाईव्ह-जी आणि ड्रोनच्या अत्याधुनिक युगात जगत असलो, तरी भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात आजही वीज नाही आणि मोबाईल किंवा टेलिफोनचे नेटवर्कही नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले भारतीय जवान शत्रूशी आणि निसर्गाशी झुंजत देशरक्षण करत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या उपक्रमात भावेश ब्राह्मणकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यासवृत्तीप्राप्त 'अरुणोदय' कादंबरीवर ऐसपैस गप्पा करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे होते.
ते पुढे म्हणाले की, सीमेवर प्रत्यक्ष जाऊन घेतला अनुभव म्हणजे ही कादंबरी. 'अरुणोदय' ही केवळ कल्पनेवर आधारित कादंबरी नसून, अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष जाऊन, उणे तापमानात जवानांसोबत राहून अनुभवलेली सद्यस्थिती आहे. हिमालयाच्या दुर्गम रांगा, तिथली हाडे गोठवणारी थंडी, भौगोलिक आव्हाने अशा वातावरणात अहोरात्र पहारा देणाऱ्या सशस्त्र दलांचे दैनंदिन जीवन आणि त्यांचे भावविश्व यावर या कादंबरीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
प्रा.प्रल्हाद वकारे आणि वर्षा किणीकर यांना ग्रंथभेट देण्यात आली. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी स्वागत केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन तर समन्वयक संजय आहेर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.१६) योगाचार्य प्रज्ञा पाटील 'प्राण ते प्रज्ञा' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
