
नाशिक, (प्रतिनिधी) : कवी तथा साहित्यिक रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहावर विविध साहित्यिकांनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया आणि समीक्षणांचा संग्रह असलेल्या ‘अक्षरमोती पेरताना…’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिक येथील ऐतिहासिक सावाना संस्थेच्या ग्रंथमित्र मु. शं. औरंगाबादकर सभागृहात संपन्न होणार आहे.
संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी संपादित केलेले हे पुस्तक वैशाली प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच प्रकाशक विलास पोतदार यांच्या कार्यालयात पुस्तकाच्या प्रती उपलब्ध झाल्यानंतर एक भावनिक आणि संस्मरणीय प्रसंग घडला. संपादक विवेक उगलमुगले आणि कवी रवींद्र मालुंजकर यांनी स्वतः प्रकाशकाकडून पुस्तकाच्या प्रती विकत घेतल्या. उगलमुगले यांनी दहा तर मालुंजकर यांनी एक प्रत खरेदी करून पुस्तकाच्या पहिल्या विक्रीचा मान मिळविला.
याबाबत भावना व्यक्त करताना मालुंजकर म्हणाले की, “स्वतःच्या साहित्यकृतीवर आधारित पुस्तक स्वतःच विकत घेऊन वाचण्याचा आनंद हा कोणत्याही सन्मानापेक्षा मोठा असतो. त्या क्षणी आपल्या साहित्यप्रवासाचे खरे मोल जाणवते.”
साहित्यप्रेमी, वाचक, कवी आणि रसिकांनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून साहित्यिक विचारांची समृद्ध शिदोरी अनुभवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
