
विंचूर, 🙁 प्रतिनिधी )लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (U-19 मुले व मुली) टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उपविजेतेपद मिळविले. या उल्लेखनीय यशात रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, विंचूर येथील विद्यार्थिनी कु. पल्लवी सोमनाथ निकम हिने महत्त्वपूर्ण योगदान देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या आणि स्पर्धात्मक वातावरणात नाशिक जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने साखळी तसेच बाद फेरीतील सामने जिंकत अंतिम फेरीपर्यंत दमदार मजल मारली.

संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या पल्लवी निकम हिने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तिच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळामुळे नाशिक संघाला निर्णायक क्षणी बळ मिळाले. पल्लवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विंचूर परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव वाढला असून क्रीडा क्षेत्रात नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे.
पल्लवी निकमच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्री. राजेंद्र चांदे, जनरल बॉडी सदस्य मा. डॉ. सुजितजी गुंजाळ, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा. श्री. जगदीश जेऊघाले, उपाध्यक्ष मा. कैलास शेठ सोनवणे व सर्व सदस्य, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. राजाभाऊ गोरे, उपाध्यक्ष व इतर सदस्य यांनी अभिनंदन केले.
तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा. नंदकुमार देवढे, उपप्राचार्य श्री. वाबळे सर, पर्यवेक्षक श्री. ठाकरे सर व श्री. माळी सर, विभाग प्रमुख श्री. राजेंद्र टिळेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, पत्रकार संघ तसेच माजी विद्यार्थी असोसिएशन यांनीही पल्लवीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री.मुकुंद झनकर यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली आणि संघ प्रशिक्षक मा.श्री. प्रदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि संघभावना यांच्या जोरावर नाशिक संघाने राज्यस्तरावर उपविजेतेपदाचा मान मिळविला.
पल्लवी निकम हिच्या या यशामुळे विंचूरसह निफाड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही क्रीडा क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. तिच्या भविष्यातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
