
हिमायतनगर प्रतिनिधी शेख मुजम्मिल
१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निष्पापावर अन्याय नको’; पदभार स्वीकारताच नवीन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासमोर संविधानाचे आव्हान
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या मुख्य पदावर नवीन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पदभार स्वीकारला आहे. या नवीन नियुक्तीनंतर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कायद्याचे राज्य आणि बेगुन्हांची सुरक्षा:
“शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निष्पाप-बेगुन्हा व्यक्तीला सजा होता कामा नये,” हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मूळ सूत्र आहे. याच तत्त्वाचे पालन करून हिमायतनगर पोलिसांनी कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव झुगारून काम करावे, अशी जाहीर मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेकदा राजकीय द्वेषापोटी किंवा दबावाखाली येऊन सामान्य आणि गरीब लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, ज्याने निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रवृत्तीला आळा घालावा, हीच जनतेची मुख्य अपेक्षा आहे.
संविधानाची चौकट आणि गरिबांना न्याय:
भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे काटेकोर पालन करून केवळ पुराव्यांच्या आधारे पारदर्शक चौकशी व्हावी. कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही आणि खऱ्या गुन्हेगाराला राजाश्रय मिळणार नाही, अशा पद्धतीने कारभार चालवून नवीन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी हिमायतनगर तालुक्यात एक नवा आणि विश्वासार्ह आदर्श निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
