
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गटस्तरीय कार्यक्रमांतर्गत एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या वतीने जेलरोड येथील टेस्ला सायन्स अकॅडमी सभागृहात तीनदिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संपन्न झाले. शिबिराचे पहिले पुष्प नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सेक्रेटरी प्राचार्य उदय शेवतेकर यांनी गुंफताना व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी विद्यार्थी जीवनामध्ये स्वयंविकास महत्त्वाचा असल्याचे सांगून सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मार्गदर्शन केले. दुसरे पुष्प गुंफताना श्री क्लासेसचे संचालक अविनाश वाघ यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे अनमोल धडे दिले. अंतिम पुष्प गुंफताना ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र मालुंजकर यांनी वाचन, मनन आणि चिंतनातून आपला सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. शिवाय विविध कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी गुणवंत कामगार योगेश कापडणीस उपस्थित होते. शिबिरासाठी परिसरातील कामगारांच्या मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. केंद्रसंचालक भरत बोरसे, पंकज देशमुख यांनी स्वागत केले. टेस्ला सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा.राहुल शिंदे, प्रा.आकाश निमसे, प्रा.अविनाश वाघ यांसह प्रा.विलास सानप, डॉ.प्रोबी दास, प्रा.निकिता कोळी, दीक्षा पगारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
