
डॉ. मंगल सांगळेकवयित्री, लेखिका व पत्रकार कोषाध्यक्ष मसाप सिन्नर मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख के. व्ही. एन. नाईक कॉलेज सिन्नर संपर्क- sangalem704@gmail.com
बाई जाते एकाएकी तेव्हा
शिजू लागतात बुरसटलेल्या चर्चागल्लोगल्ली
नि चौकाचौकात अशावेळी
ढवळला जातो तिच्या निश्चल चारित्र्याचा तळ
नेहमीच्या सवयीनुसार जोडले जाते तिचे नाव
नाहकच जातीने पुरुष असणाऱ्या एखाद्याशी
मुद्दामच झाकला जातो तिचा
चांगुलपणा तिच्या चारित्र्यावर
उडविलेले शिंतोडे आणखी ठळक करण्यासाठी
म्हणूनच बायांनो.…
.लढायला शिका गं! मरायला नाही!
जग बदलाचे कितीही वारे वाहू लागले तरीही
त्यांचे विचार आजही तितकेच खुजे आहेत!
तुमच्या दुःखाशी नसतं
सोयरंसुतक अख्ख्या जगात कुणाला
तुम्ही जाता इथल्या जीवघेण्या प्रवासाला कंटाळून
पण त्याचंच भांडवल करून रक्ताळलेले हात
वृत्त वाहिन्यांचे माईक पकडून रचू लागतात
तुझ्या आयुष्याच्या मनघडन कहाण्या!
मग विषारी जिभा फिरत असतात
सगळीकडे बिनधोकपणे एखाद्या विध्वंसक वळूप्रमाणे!
