लेखक;- रमाकांत नारायणे, मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या उद्धाराकरिता व समतेच्या लढ्याकरिता लोकांना तयार करण्याकरिता रहिमतपूर येथे ५ मे १९२६ रोजी आले होते. ही लोकजागृतीची सभा स्थानिक कॉलेज विद्यार्थी श्री. चांगदेव खैरमोडे यांनी घडवून आणली होती. ढोर समाजाचे कोल्हापूर येथील समाज कार्यकर्ते कै. गंगाधर यशवंत पोळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रहिमतपूर येथे त्यांच्याबरोबर हजर होते. तसेच चांभार समाजाचे नेते श्री. सीताराम शिवतरकर, श्री. कदम मास्तर बंधू, श्री. गायकवाड, श्री. कांबळे इत्यादी २५ एक कार्यकर्ते हजर होते.प्रथम श्री. चांगदेव खैरमोडे यांचे स्वागतपर भाषण झाले होते.

नंतर श्री. सीताराम शिवतरकर यांनी डॉ. भिमराव आंबेडकर यांची व त्यांच्या या पुढील अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची लोकांना कल्पना दिली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या सर्व जातींनी यापुढे स्वस्थ न बसता सर्व प्रकारची झीज सोसून आपापल्या शक्तीनुसार समाजोद्धारासाठी झटले पाहिजे. सर्व लोकांनी प्रथम शिक्षण घेऊन विद्वान झाले पाहिजे, वतनी इनामाच्या छोट्या तुकड्यात गुंतून न राहता व आळशी न बनता निरनिराळ्या सर्व गवंडी, सुतार, विणकर वगैरे बनून आपला उद्धार आपणच करून घेतला पाहिजे असे कळकळीचे व मनापासून भाषण केले. श्री. ग.य. पोळ यांनीही समाजातील अनिष्ट चालिरीती बंद करणेबाबत भाषण केले. नंतर श्री. गायकवाड वगैरेंची भाषणे झाली व सभा संपली.या घटनेची स्मृर्ती चिरंतर राहवी म्हणून दलित मुक्ती सेनानी श्री. आर. एन. चव्हाण यांचे पुढाकाराने व प्रेरणेने ‘समता स्तंभ स्मारक समिती’ स्थापन झाली आणि रहिमतपूर येथे समता स्तंभ उभारण्यात आला. स्तंभाचे अनावरण दि. २०.१०.१९८५ रोजी विधानसभेचे सभापती नामदार श्री. शंकरराव जगताप यांनी केले

.डॉ. आंबेडकरांनी अशी नुकतीच समाजकार्यास सुरवात केली होती त्यावेळेस त्यांना बाबासाहेब हा ‘किताब मिळाला नव्हता तो त्यानां महाड येथील चवदार तळ्याच्या लढ्यानंतर मिळाला.*रहिमतपूरच्या या सभेत बाबासाहेबांनी महारांना वतनदारी व गांवकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे शेकडो महारानी गांवकीची कामे, हक्क सोडून इतर कामे करण्यास सुरवात केली . ही खरी म्हणजे सामाजिक क्रांतीचीच सुरवात होती. ज्या कामामुळे किंवा ‘हक्क ‘ या गोंडस शद्वामुळे महार बांधवांच्या मानेवर अस्पृश्यतेचे जूं कायमचे चिकटून बसते त्याचा महारांनी त्याग केला पाहिजे. ते जूं मानेवरूनच नव्हे तर मनातून फेकून दिले पाहिजे. त्यासाठी उपासमार झाली, हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी चालेल हा क्रांतिविचार त्या वतनदारी त्यागण्यामागे होता. अश्या या क्रांतीकारी विचारांची सुरवात रहिमतपूरच्या बाबासाहेबांच्या सभेत झाली. त्याचे रहिमतपूर येथे उभे राहिलेले स्मारक हे भीमा कोरेगाव येथील स्तंभासारखे त्या इतिहासाचे साक्षीदार आहे. म्हणून रहिमतपूर मधील या घटनेला फार मोठे महत्व आहे; हे बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि सर्वच समाजाने समजून घेतले पाहिजे.*पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ मार्च १९२८ मुंबई कायदेमंडळात (Bombay Legislative Council) ‘महार वतन बिल’ (Mahar Vatan Bill) मांडले होते. परंतु त्यास विरोध झल्लामुळे ते त्यांना मागे घ्यावे लागले. पुढे १९३७ मध्ये जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वतंत्र मजूर पक्षा’च्या माध्यमातून निवडून आले, तेव्हा त्यांनी पुन्हा हे बिल मांडले. पुढे दीर्घ संघर्षानंतर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५९ मध्ये मुंबई सरकारने ‘मुंबई परगणा आणि कुळकर्णी वतन रद्द करण्याबाबतचा कायदा’ संमत केला, ज्याद्वारे ही वतन पद्धत कायमची नष्ट झाली. छत्रपती शाहू महाराजांनी १९२१ मध्ये कोल्हापूर संस्थानात जे वतन ‘लेखणीच्या एका फटक्याने’ नष्ट केले होते, तेच कार्य मुंबई प्रांतात करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांना मोठा संघर्ष करावा लागला
.रमाकांत नारायणे ०५-०५-२०२६संदर्भ – (१) रहिमतपूरची मुद्रा स्मरणिका २०१२ (२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ (३) डॉ. आंबेडकरांचे वतन बिल (पूर्वार्ध, उत्तरार्ध) रा. वि. भुस्कुटे, साधना साप्ताहिक, डिसेंबर १९९३ (४) श्री. ग.य. पोळ यांचे आत्मचरित्र
