
नाशिक (प्रतिनिधी वार्ताहर – दिलीप नारद,) नाशिक
मुक्काम पोस्ट ओढा, तालुका व जिल्हा नाशिक येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या गावात यंदाही भैरवनाथ महाराजांची भव्य यात्रा बुधवारी (दि. ०१ एप्रिल २०२६) मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
पुरातन काळापासून ओढा गावाला विशेष ऐतिहासिक व धार्मिक ओळख आहे. पौराणिक मान्यतेनुसार येथे सीतामाई यांनी लव-अंकुश यांना जन्म दिला. तसेच पेशवेकालीन सरदार रंगनाथराव ओढेकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर उभारले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह करून ते सर्वांसाठी खुले केले, ही ऐतिहासिक घटना या परिसराशी जोडलेली आहे.

गावातील गोदावरी काठावर वसलेले सिद्धिविनायक मंदिर नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढा येथे गोदा घाटाची उभारणी सुरू असून, याठिकाणी साधुसंतांना शाही स्नानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराजांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. विविध सोंगांच्या आकर्षक मिरवणुकीने ग्रामस्थांनी जल्लोषात सहभाग घेतला. संध्याकाळी करमणुकीसाठी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा गावकऱ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
विशेष म्हणजे, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मन्सूर शहा बाबा यांचा संदल काढून सर्वधर्म समभावाचा आदर्श घालून दिला. “हम सब एक है” हा एकात्मतेचा संदेश या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला.

या यात्रेसाठी नाशिक पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच प्रियाताई पेखळे, उपसरपंच योगेश कापसे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील गजानन भोर तसेच यात्रा समितीचे अध्यक्ष बाबुराव पेखळे, उपाध्यक्ष शंकर पेखळे, खजिनदार मधुकर शिरसाट आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखत मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळे यात्रा उत्सव निर्विघ्न व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
