
सिन्नर (प्रतिनिधी) अनेकजणांना गंडा घालणाऱ्या तसेच अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातवर कडक कारवाई करून जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी सिन्नर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनाचा आशय असा, कॅप्टन अशोक खरातने धर्माच्या नावाने श्रद्धेचा बाजार मांडून अनेक अंधभक्तांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे.त्यांचे आर्थिक,मानसिक शोषण केले आहे,तसेच अनेक निरपराध महिलांना वासनेची शिकार बनवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले अशा नराधम विकृतीचा कळस गाठणाऱ्या भोंदू बाबांची सखोल चौकशी करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तसेच मानसिक,आर्थिक शोषण करणाऱ्या अशोक खरातवर पोलिसांनी कडक कारवाई करून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा करावी.त्याचबरोबर त्याच्या बरोबर असणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्या अंध भक्तांची देखील चौकशी व्हावी असे मागणी अंनिसने निवेदनात केली आहे. निवेदनावर अंनिसचे पदाधिकारी हरिभाऊ तांबे,सुकदेव वाघ,महामित्र दत्ता वायचळे,डॉ.श्यामसुंदर झळके, ॲड.आत्माराम उगले यांच्या स्वाक्षरी आहेत.
