नाशिक:(प्रतिनिधी)- मानवी कल्याणात योगाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळेच शरीर आणि मनाला योग्य दिशा मिळते. म्हणूनच योग म्हणजे मोक्षाचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन
प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी यांनी केले
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २४२वे पुष्प गुंफताना 'योग-एक जीवनशैली' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी नरसिंग देशमुख होते.
डॉ.गवळी पुढे म्हणाल्या की, योग ही जगण्याची सुंदर कला आहे. आपल्यातील सजगता हरवत चालली आहे. योगातील शक्ती आत्मसात करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. योग म्हणजे फक्त आसने करणे नव्हे तर जीवनशैलीही समजून घेण्याची गरज आहे. वातावरण, परिस्थिती, पर्यावरण बदलत गेले पण योगातील शास्र मात्र आजही तेच आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि योगाभ्यास याची सांगड घालण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
उषा शिरसाठ आणि सुहास टिपरे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२७) 'स्नेहगंधाली' या पुस्तकावर स्नेहल येवला ऐसपैस गप्पा करणार आहेत.