
नाशिक ( प्रतिनिधी )रवींद्र विद्यालय, द्वारका, नाशिक येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक श्री. राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री.मनोज पिंगळे होते , तसेच सेक्रेटरी वासंतीताई गटणे उपाध्यक्ष श्री. वसंत राऊत, संचालक श्री हरि काशीकर, संचालिका मृणाल पाठक, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.वर्षा देशमुख आणि पर्यवेक्षक श्री. राजेश मालवी हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मराठी वाचनाची जोपासना करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या कविता वाचनाने व कविता गायनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता सादरीकरण, नृत्य व गायनाचे आकर्षक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वर्षा देशमुख मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे व तिच्या जतन-संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विषयाच्या शिक्षकांनी अत्यंत मोलाची मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ.मंगला गावित यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी शाळेचे अभिनंदन केले आणि मराठी भाषेचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
