

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग चिंतन– चहू वेदी जाण साही शास्री कारण। अठराही पुराणे हरिसी गाती॥१॥ मंथोनि नवनीता तैंसे घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु॥२॥ एक हरि आत्मा जीव शिव सम। वाया तू दुर्गमी न घाली मन॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ। भरला घनदाट हरी दिसे॥४॥ वेद म्हणजे ईश्वर निर्मित ४ अपौरुषीय वाणी। वेद कोणत्याही मनुष्याने, किंवा ऋषींनी उत्पन्न केले नाहीत, म्हणून त्यांना अपौरुषीय म्हटले आहे। परमेश्वर सृष्टीच्या आरंभी ब्रम्हदेवाला उत्पन्न [प्रकट] करतो, व त्यासाठी, व सर्व सृष्टी साठी ४ वेदांना प्रकट करतो। वेदैश्च सर्वैरहमेववेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्॥गीता-१५-४-१५॥ ॐ नमो जी विद्या आद्या। वेद प्रतिपाद्या । जय जयाजी स्वसंवेद्या । आत्मरुपा॥ ज्ञानेश्वरी॥१-१॥ यो ब्रम्हाणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै। तं ह देवमात्मबुध्दिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये।।श्वेताश्वतरोपनिषद्।।६-१८।। जो सृष्टीच्या सुरुवातीला ब्रम्हदेवाला उत्पन्न करतो, व जो त्यासाठी वेदांना प्रवृत्त करतो, आपल्या बुध्दीला प्रकाशीत करणार्या अशा ईश्वराला मी, मुमक्षु शरण आहे.
वेद ४ आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद। वेदांचे अध्ययन करायला अनेक नियम आहेत ते सर्वांना शक्य नाहीत। संत सद्गुरु वेदांचा सार आपल्याला आयता उपलब्ध करुन देतात। ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी सतत श्रुतींचा म्हणजे वेदांचा अभ्यास करावा अशी १ ओवी ज्ञानेश्वरीत आहे।
“तैसा प्रतिपाद्यु जो ईश्वरु। तो होआवयालागी गोचरु। श्रुती चा निरंतरु अभ्यासु करणे॥१६-१०३॥ “ वेद “नेति नेति” म्हणतात याचे २ अर्थ आहेत। १ अर्थ ईश्वराचे स्वरुप इतके गहन आहे कि त्याचे वर्णन वेदांना ही करता येत नाही। वेद सुध्दा ईश्वराला पूर्णपणे जाणू शकत नाहीत। पण दुसरा अर्थ असा आहे कि, वेद हे स्वत: ईश्वराने निर्माण केलेत। वेदांतकृत् वेदविदेव चाहं।गीता। वेदांचा कर्ता ईश्वर आहे। वेद ईश्वराचे श्वास आहेत। मग जे ईश्वराने निर्माण केले, जे ईश्वनिर्मीत आहे, ते अपूर्ण कसे असेल? वेदांना हे माहीत नाही असे नाही, वेदांना सर्व माहित आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी १ उदाहरण दिले। “जसे न संघणे वरी। बाळा पतीशी रुप करी। बोलु निमालेपणे विवरी अचर्चाते॥१५-४६८॥ एखाद्या नव वधू चा जेव्हा वाङ्निश्चय [साखरपुडा] होतो, त्यावेळी नवरदेवाचे मित्र, नातेवाईक सर्व आलेले असतात, नववधूच्या मैत्रिणी सुध्दा असतात। मुलीच्या मैत्रिणी तिला विचारतात, या वर पक्षात तुझा होणरा पति कोणता आहे? तेव्हा ती मुलगी शरमेने काहीच बोलत नाही। मैत्रिणी एका एका कडे हाताने खूणवून विचारतात, हा तुझा पति आहे का? मुलगी काही न बोलता फक्त मानेने खूणवून मान हलवून नाही म्हणते, मग हा का? असे एक-एकाकडे मैत्रिणी बोट दाखवून खूणेने विचारतात, प्रत्येक वेळी मुलगी नाही म्ह्णून मानेने खुणवते, पण प्रत्यक्ष त्या नवर्या मुलाकडे जेव्हा मैत्रिणी खूण करतात, तेव्हा ती मुलगी काहीच बोलत नाही व मान ही हलवत नाही, मैत्रिणी समजून जातात, कि, हाच तो मुलगा आहे, जो तिचा होणारा पति आहे। नेति नेति जेथे काहीच बोलणे नाही तेथे सर्वस्व आहे ।याच अर्थाने वेद नेति नेति म्हणतात, याचा अर्थ हेच संपूर्ण आहे। वेदांना ईश्वराचे संपूर्ण ज्ञान आहे। वेदान्ताची ४ महावक्ये- (१) अहं ब्रम्हास्मि।-यजुर्वेद। (२)- प्रज्ञानं ब्रम्ह।- ऋग्वेद। (३) अयमात्मा ब्रम्ह।-अथर्ववेद॥ (४)-तत्वमसि।- सामवेद॥ पुराण याचा अर्थ जे जुने, प्राचीन असून नित्य नवीन आहे ते पुराण। “पुरा अपि नवं”
जसजसा काळ बदलत गेला, तशी माणसाची बुध्दी कमी होत गेली, गहन वेद सर्वांना समजत नाही, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना काही सोप्या गोष्टी, दृष्टांत देऊन जर ब्रम्हज्ञान सांगीतले तर त्यांना लवकर समजेल याचा विचार करुन व्यासांनी १८ पुराणांची रचना केली। आबालवृध्दांना सुध्दा ब्रम्हज्ञान समजले पाहिजे हाच व्यासांचा उदात्त हेतु होता। संत एकनाथ महाराजांचे भारुड हे सुध्दा याचेच उदाहरण आहे।
१८ पुराणे- (१) ब्राम्ह (२)-पद्म पुराण (३)-विष्णु पुराण (४)-वायु (५)-भागवत (६)-भविष्य (७)-नारद पुराण (८)- मार्कंडेय (९)-अग्नि पुराण (१०)-ब्रम्हवैवर्त (११)-लिंग (१२)-वराह (१३)-स्कंद पुराण (१४)-वामन (१५)-कूर्म (१६)-मत्स्य (१७)-गरुड (१८)-ब्रम्हांड पुराण. ‘पुरा अपि नवं इति पुराणं.’ खूप जुने, पुरातन काळा पासून असून सुध्दा जे नित्य नवीन वाटतात ते पुराण. सर्व पुराणांची श्लोक संख्या चार ४ लाख आहे. पूर्वी शंभर कोटी संख्याक असे एकच पुराण होते. नंतर वेदव्यासांनी त्याचे १८ विभाग केले. असे पद्म पुराण, मत्स्यपुराणादिकात सांगितले आहे. पुराणमेकमेवासीदस्मिन्कल्पान्तरे नृप। त्रिवर्ग साधनं पुण्यं शतकोटीप्रविस्तरम्।। कालेनाग्रहणं दृष्ट्वा पुराणस्य ततो नृप। व्यासरुपं विभुं कृत्वा संहरेत्स युगे युगे।।१-२३-३०।। सहा शास्रे- (१)-न्यायदर्शन-गौतम (गौतम-सूत्रे) (२)-वैशेषिक दर्शन-कणाद महर्षि (३)-सांख्य-शास्र (कपिल) (४)-योगशास्र-पतंजली (पतंजली योगसूत्र) (५)-पूर्व मीमांसा-(जैमिनी) (६)-उत्तर मीमांसा-(ब्रम्हसूत्र)-व्यास. याप्रमाणे एकूण ६ शास्रे आहेत. हे ४ वेद, १८ पुराणे ६ शास्रे या सर्वांचा अभ्यास करणे, ते समजून घेणे, व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे ही काही साधी गोष्ट नाही। एकाला स्वप्रयत्नाने समजणे शक्यच नाही। हा विचार करुन संतांनी या सर्वांचा सार काढून आपल्यापुढे ठेवला। आपण फक्त तेवढेच घ्यायचे। आता या सर्वांचा सार काय आहे? याचा विचार करु।
चाणक्य का कथन है,” [नीलेश्वरी]
अनन्तशास्रं बहुलाश्च विद्या: अल्पश्च कालो बहुविघ्नता च। यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥ चाणक्य नीति॥१५-१०॥ शास्रे अनंत आहेत, विद्या खूप आहेत, परंतु, आपल्याकडे वेळ [आयुष्य] थोडा आहे, अशा वेळी जसा राजहंस दूध आणि पाणी वेग-वेगळे करतो, व फक्त सार {दूध} घेतो। त्याचप्रमाणे संतांना हंसाची, परमहंसाची उपमा दिली आहे। या जगात सार काय असार काय हे सर्व शास्रांतून ते निवडून काढतात व ज्यात आपले शाश्वत-चिरंतन कल्याण आहे, तेच आपल्याला निवडून देतात। सर्व सार आहे-“ईश्वराचे ध्यान करणे, ईश्वर भक्ती करणे, ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणे। आलोड्य सर्व शास्राणि विचार्य च पुन: पुन:। इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणो हरि:॥ शुकाचार्य पुराण॥ सर्व शास्रांचा पुन्हा पुन्हा अभ्यास व चिंतन केले असता एकच निष्पन्न होते कि, नारायणाचे, ईश्वराचे ध्यान करावे। तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राम्हण:। नानुध्यायान् बहून् शब्दान् वाचो विग्लापनं हि तत्॥ बृहदारण्यक-उपनिषद॥ अनेक शास्रांचे वाचन करण्याची गरज नाही, तो एक वाणीचा अभ्यास आहे। वाणीचा विलास आहे। शास्रांचा सार एवढाच आहे कि, त्या परम तत्वाला, ईश्वराला जाणुन घेऊन त्याचेच ठिकाणी लक्ष्य लावावे। त्याचे ध्यान, चिंतन करावे। इतर फक्त वाणी ची बडबड आहे।
सर्ववेदांतसारं हि श्रीभागवतमिष्यते। तद्रसामृततृप्तस्य नान्यत्र स्याद्रति: क्वचित्॥-] (श्रीमद् भागवत-१२-१३-१५) सर्व वेदांचा सार म्हणजे भागवत, यात जो तृप्त झाला त्याला इतरत्र गोडी वाटणार नाही। तसेच भगवद्गीता सर्व वेदांचा सार आहे असे महर्षि व्यासांनीच म्हटले आहे। त्यामुळेच तुकाराम महाराजांच्या अभंगात नेहमी गीता व भागवत यांचा उल्लेख असतो। “गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे॥१॥” “अर्जुना वेदविद जरी जहला। परि माते नेणता वाया गेला। कण सांडोनि उपणीला कोंडा जैसा॥ज्ञानेश्वरी॥“ वेदांचा कितीही अभ्यास केला, वेदविद्या पारंगत झाला तरी परमेश्वराला जाणले नाही तर त्याचे वेद ज्ञान, धान्य पाखडतांना धान्याचे कण, दाणे सोडून कोंडा उपनावा, धान्य सोडून कोंडाच घेतला असे होईल। असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात।
अनेक ग्रंथ, अनेक शास्रे आहेत, किती वाचणार? तुकाराम महराज म्हणतात, इतके ग्रंथ आहेत कि ते वाचायला आपले आयुष्य देखील पुरणार नाही, वाचल्यावर ते समजतीलच इतकी प्रखर बुध्दी प्रत्येककडे नाही। “पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हातीं। नाही ऐशी मती अर्थ कळे॥१॥ होईल ते हो या विठोबाच्या नावे। अर्जिले ते भावे जीवी धरु॥२॥ एखादा अंगासी येईल प्रकार। विचारिता फार युक्ती वाढे॥३॥ तुका म्हणे आळी करिता गोमटी। मायबापा पोटी येते दया॥४॥ [२१९६] अनेक ग्रंथ पाहवयास पुष्कळ आयुष्य पाहिजे, पण ते तर आपल्या स्वाधीन नाही, व त्या ग्रंथार्थांचे ज्ञान होईल अशा तीव्र बुध्दीची अनुकूलताही नाही॥१॥ विठोबाचे नाम घेण्याने जे होणार असेल ते होवो। जे साधन मिळविले आहे तेच मनोभावाने जीवी धरुन राहू॥२॥ विचार करावयास गेले तर अनेक प्रकारच्या कुतर्क युक्ती वाढून एखादा जाणतेपणाचा (अभिमानाचा) भाव आपणाकडे येईल॥३॥ तुकाराम महाराज म्हणतात, बालकाने चांगला छंद घेतला तर त्याचा तो पुरविण्याविषयी आईबापांच्या मनात दया येते।(त्याप्रमाणे निष्ठेने हरीचे नाम घेतले तर हरीला त्या भक्ताची करुणा येऊन तो त्याचा उध्दार करील)॥४॥ पे-४६२॥
संत तुलसिदास म्हणतात, “श्रुति पुराण बहु कहेहु उपायी। छूट न अधिक अधिक उरझाई॥ ” ग्रंथ वाचल्यास अनेक ग्रंथात वेगवेगळी मते असतात ते पाहून सामान्य माणसाला ग्रंथ समजत तर नाहीच, पण त्याऐवजी बुध्दीभ्रम, संशय उत्पन्न होतात। शंकराचार्यांनी म्हटले आहे,” शब्दजालं महारण्यं चित्त भ्रमणकारकं”। वेद-शास्र ज्ञान हे एक शब्दांचे जाळे मोठे अरण्य आहे, त्यात एकदा अल्पबुध्दीचा मनुष्य अडकला की तो रस्ता भरकटतो, शास्र-ज्ञान प्रत्येकाला अवगत होत नाही। त्यासाठीच संत, गुरु सर्व शास्रांचा आयता सार काढून आपल्याला देतात। लोणी मंथन करुन तुप निघते, तसे संत सर्व शास्रांचा सार काढून आपल्यापुढे ठेवतात। आपण फक्त तोच ग्रहण केला पाहिजे। सिध्द-संत शास्रांचा अभ्यास ही सुध्दा एक दैवी देणगीच म्हणावी लागेल। ईश्वरकृपेशिवाय शास्र ज्ञान सर्वांना समजू शकत नाही, त्यासाठी सुध्दा तपश्चर्या व गुरुकृपा लागते।
एकदा जगद्गुरु शंकराचार्य सायंकाळच्या वेळी फिरायला चालले होते, त्यांना एका झाडाखाली एक ८० वर्षाचा म्हातारा मनुष्य एका दिव्याच्या मंद प्रकाशात काही तरी वाचतो आहे असे दिसले। जेव्हा ते त्याच्याजवळ गेले तेव्हा त्यांना समजले कि तो म्हातारा एक संस्कृत व्याकरणाचे पुस्तक वाचत होता व कृ-म्हणजे करणे असे पाठांतर करीत होता। आचार्यांनी त्याला विचारले, हे काय करतो आहेस? तो म्हणाला, मी आयुष्यभर काहीच केले नाही, मला आता उपरती झाली की आपण देवाचे काहीतरी करावे। पण आपले देवाधर्माचे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत। ते मला समजण्यासाठी अगोदर संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल, नंतर मी ग्रंथांचा वाचन, अभ्यास करीन, मग मला देव भेटेल। शंकराचार्य म्हणाले अरे, मूर्ख माणसा, एवढे आयुष्य गेले तू काही केले नाही। आता तुझे आयुष्य तरी किती उरले? एवढ्यात तू संस्कृत चा अभ्यास, ग्रंथवाचन हे केव्हा करशील? त्यापेक्षा मी तुला शास्रांचा सार सांगतो, त्याप्रमाणे कर, तुझा उध्दार होईल। तुला हा शास्रांचा खटाटोप करण्याची गरज नाही। फक्त एवढेच कर ईश्वराचे नामस्मरण कर। “भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते॥”संप्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डु-कृञ्-करणे॥ मृत्युचा वेळ जवळ आला असतांना कृ-म्हणजे करणे हे संस्कृत चे व्याकरण तुझे रक्षण करणार नाही, त्यापेक्षा तू ईश्वराचे भजन कर। शंकराचार्यांनी त्याचे साठी “चर्पटपंजरिका” नावा चे स्तोत्र तयार केले। त्यात सर्व शास्रांचा सार थोडक्यात सांगीतला। “मंथुनी नवनीता। तैसे घे अनंता।”[दही घुसळून लोणी घ्यावे तसे]
या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांना हेच सांगायचे आहे। तुकराम महाराज म्हणतात,-
चार वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी॥१॥न करी आणिक साधन, कष्टसी का वायाविण॥२॥ न करी आणिक साधन। कष्टसी का वायाविण॥३॥ अठरा पुराणांचे पोटी। नामाविण नाही गोठी॥४॥ गीता जेणे उपदेशिली। ते ही विटेवरी माऊली॥५॥ तुका म्हणे सार धरी। वाचे हरिनाम उच्चारी॥४॥[१६९६]
वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि साधिला॥१॥ विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाम गावे॥२॥ सकळ शास्रांचा विचार। अंती इतलाचि निर्धार॥३॥ अठरा पुराणी सिध्दांत। तुका म्हणे हाचि हेत॥४॥[३१२८]
यदुर्लभं यदप्राप्यं मनसा यन्न गोचरं। तदप्यप्रार्थितो ददाति मधुसूदन:॥ [भागवत] जगात जे दुर्लभ आहे, मनाने ज्याची कल्पना सुध्दा करता येत नाही अशी वस्तु (ब्रम्हानंद, ज्यात सर्व सुखे आहेत) ईश्वर भक्ती केल्याने, न मागता, सुध्दा परमेश्वर भक्ताला देतो।
जीव-शिवात एकच आत्मा (परमेश्वर) समान रुपाने व्याप्त आहे। “प्रभु व्यापक सर्वत्र समाना। प्रेम ते प्रगट होई मै जाना”। संत तुलसीदास। परमेश्वर सर्व ठिकाणी समान व्याप्त आहे, जेथे प्रेम, निष्काम भक्ती आहे तेथे तो प्रकट होतो। अविद्या कल्पना येणे झाला जीव। मायोपाधी शिव बोलिजेती॥१॥ एकनाथ महाराज हरिपाठ॥ [जीव-शिव हा विषय अत्यंत गहन आहे, योग्य वेळी त्याचे विवेचन करण्यात येईल।] सर्वत्र ईश्वराला पहावे, या व्यतिरिक्त इतर कठीण साधनांकडे लक्ष्य देऊ नये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी त्या हरि चा नेहमी पाठ करतो, नेहमी ईश्वराचे स्मरण करतो, त्यामुळे मला सर्वत्र हरि, ईश्वरच ओतप्रोत भरलेला दिसतो।
