

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥
हरिपाठ अभंग विंतन- हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥२॥ असोनि संसारी जिव्हे वेग करी। वेदशास्र उभारी बाह्या सदा॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यसाचिये खुणा। द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥ पुण्याची गणना कोण करी? श्रृति-स्मृति ग्रंथात सुख प्राप्तीचे ३ मार्ग सांगीतले आहेत। कर्म-ज्ञान-उपासना। कर्म-सत्कर्म करणे। शास्रात सागीतल्या प्रमाणे विहित कर्म, सत्कर्म करणे। सत्कर्म केल्याने जेवढे कर्म करावे, तेवढेच फळ मिळते। कर्माचे फळ अनित्य आहे, कायम स्वरुपाचे नाही। “यत्र यत्र कृतकत्वं, तत्र तत्र अनित्यत्वं।” “पूर्वजन्म कृतं कर्म तद्दैवमिति कथ्यते।” पूर्व जन्मात आपण जे कर्म करतो त्यालाच दैव, भाग्य, नशीब असे म्हणतात। या जन्मात अनेक लोक पापे करतात, तरी ते सुखी दिसतात, कारण त्यांचे पूर्वजन्मीचे पुण्य। सत्कर्माचे फळ पुण्य, असत्कर्म फळ पाप, दु:ख। पूर्वपुण्य संपले कि पुन्हा पूर्ववत स्थिती। कर्म वेगळे व कर्मयोग वेगळा। किती ही चांगले कर्मे केलीत तरी त्यांचे फळ मृत्युलोक ते स्वर्ग सुखाची प्राप्ती पर्यंतच आहे। स्वर्ग लोकातील पुण्य संपले कि स्वर्गातील देवांना सुध्दा पुन्हा मृत्युलोकात यावे लागते। अनेक प्रकारचे यज्ञ, सत्कर्म, केव्हातरी संपतेच। त्यामुळे कर्माचे फळ अनित्य आहे। “मग तया पुण्याची पाऊटी सरे। सवेचि इंद्रपणाची उटी उतरे। मग येऊ लागती माघारे। मृत्युलोका।” अशी ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे। “स्वर्ग हु स्वल्प अंत दुखदायी” संत तुलसीदास। त्यामुळे नुसत्या सत्कर्मांनी ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही। ईश्वर नित्य, सहज, स्वयंसिध्द आहे, त्यामुळे ईश्वर प्राप्ती साठी अगणित पुण्य पाहिजे। “नास्त्यकृत: कृतेन।” असे उपनिषद वचन आहे। इश्वर स्वयंसिध्द असल्याने काहीतरी केल्याने प्राप्त होत नाही। ईश्वराच्या प्राप्तीसाठी अगणित पुण्य च लागते। मग हे अगणित पुण्य कशाने प्राप्त होते? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात-हरि भक्ती, ईश्वर नामस्मरण केल्याने। हरि हरि असे नामस्मरण केल्याने, इश्वर भक्ति केल्याने इतके पुण्य प्राप्त होते कि त्याची [गणती-मोजमाप कोण करु शकेल?] मोजणी, गणतीच करता येत नाही। व त्याच अगणित पुण्याने ईश्वर प्राप्ती होते।
