
लेखक:- डॉ.गोरखनाथ देवरे

॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥
सद्गुरुंच्या कृपेने ज्ञानेश्वर महराजांच्या “हरिपाठ” या स्वाध्याय रुपी ग्रंथातील काही निवडक अभंगांचे चिंतन- नित्यनेमाने हरिपाठ पठण करणारे वारकरी मंडळी आपण पहातो, पण यातील किती जणांना हरिपाठाचा खरा अर्थ माहित असेल? क्वचितच काहींना माहित असेल। सर्वसामान्यांसाठी हा उपदेश व नित्यनेम रुपी साधना यात आहे। श्रध्देने हरिपाठ म्हणणे हे योग्यच आहे, परंतु, त्यातील अर्थ व ज्ञान समजले तर अधिकच श्रेष्ठ आहे। अर्थाविण पोथी वाचूनि काय। असे संत एकनाथ महाराजांचे वचन आहे। आपण कीर्तन प्रवचने अनेकदा ऐकतो, परंतु आपल्याला अधिकाधिक खोलात जाणे आवश्यक आहे। कोणतेही सिध्द-संत प्रणित ग्रंथात त्या संतांची कृपा, आशिर्वाद असतो, श्रध्देने व दृढ विश्वासाने त्यांचे पठण, चिंतन केल्याने त्या संतांच्याच कृपेने आपल्याला योग्य वेळी, आपल्या आतून त्यातील गूढ अर्थाचा बोध होतो। केंव्हा केंव्हा कुठेतरी नवीन वाचनात येते, किंवा कोणाकडुन ऐकायला मिळते, कोणत्या तरी निमित्ताने संत कृपेने, ईश्वर कृपेने त्याचा अर्थबोध होतो। अगदी सर्वसामान्य आबालवृध्दांना सुध्दा अध्यात्माची प्राप्ती व्हावी, ईश्वरानुभूति व्हावी यासाठी सर्व संतांनी सर्व शास्रांचा सार काढून अगदी सोपे उपाय (मार्ग) सांगीतले। त्यापैकी “हरिपाठ” हा एक आहे। श्रुति-स्मृति ग्रंथात ३ भाग सांगितलेले असतात। कर्म-ज्ञान-उपासना। उपासना म्हणजेच भक्तीमार्ग। “हरिपाठ” हा भक्तीमार्गाच्या अंतर्गत आहे। हरिपाठ जरि दिसायला साधा, सोपा असला तरी त्यात अध्यात्माचे सर्व गूढ ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगीतले आहे। योग्य अधिकारी व्यक्तीला त्यातील गूढ ज्ञान योग्य वेळी प्राप्त होते। “हरिपाठ या शब्दाचा अर्थ हरि-हरि या नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणे।” अर्थात् नाम स्मरण, नाम-जप करणे। सुरुवातीला दॄढ श्रध्देने, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेऊन हरि नामाचा वारंवार उच्चार करावा। हरिपाठ म्हणावा। हा सुध्दा एक प्रकारचा स्वाध्याय आहे। नित्यनेमाने केला जातो तो स्वाध्याय असा स्वाध्याय शब्दाचा एक अर्थ आहे। स्वत: चे अध्ययन म्हणजे “स्वाध्याय” असा ही एक अर्थ आहे। स्वाध्याय म्हणजे कोणत्याही सिध्द-संत ग्रंथाचे नियमित वाचन, पठण। उदाहरणार्थ-हरिपाठ, श्री गुरुगीता, विष्णुसहस्रनाम, रोज आरती करणे, इत्यादि। स्वाध्यायाच्रे महत्व पतंजली ऋषि आपल्या योगसूत्रात सांगतात,” स्वाध्यायात् इष्टदेवता संप्रयोग:।” “स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोग:।” [पतंजल योगसूत्र-२-४४।]
ज्या देवतेचा आपण स्वाध्याय करतो, ती देवता स्वाध्यायाने प्रसन्न होते। साधकावर कृपा करते। यानुसार गुरुगीतेचा स्वाध्याय केल्याने, गुरुगीतेचे रोज पठण केल्याने सद्गुरु प्रसन्न होतात। विष्णुसहस्रनाम-विष्णु। तसेच हरिपाठाने “हरि” प्रसन्न होतो। हरि हे ईश्वराचेच एक नाव आहे। जो भक्तांचे दु:ख हरण करतो तो हरि। कोणताही स्वाध्याय केला तरी फलश्रुती एकच आहे-“ईश्वरप्राप्ती-आत्मसाक्षात्कार”। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं। सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति॥ आकाशातून पडलेले पाणी जसे जमिनीवर कुठेही पडले तरी समुद्रातच जाते, तसेच कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच-एकाच ईश्वराला पोहोचतो।
ईश्वर एकच आहे, परंतु, हे ज्ञान सर्वांना एकदम होत नाही। त्यासाठी संतांनी अधिकारपरत्वे ईश्वरप्राप्ती चे वेगवेगळे मार्ग सांगीतले आहेत। ज्याला अध्यात्माचे कसलेही
ज्ञान नाही, पण ईश्वरप्राप्तीची तळमळ आहे, ज्ञान नाही पण श्रध्दा आहे, अशांसाठी सिध्द-संतांनी भक्तीमार्ग सांगीतला आहे। त्याचाच एक भाग -नित्यनेमाने हरिपाठ म्हणणे। हरिपाठाचा स्वाध्याय करणे। या हरिपाठातील [काही निवडक अभंगांचा] सामान्य अर्थ व गहन-गूढ अर्थ, जो ईश्वरकृपेने किंवा गुरुकृपेने प्राप्त होतो त्याचे चिंतन यथावकाश ऊद्यापासून या ग्रुपवर प्रक्षेपीत केले जाईल। जिज्ञासूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा। या चिंतनावरुन हरिपाठ दिसायला जरि साधा असला तरी त्यात किती गहन ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगीतले आहे, हे लक्षात येईल। या निमित्त्ताने हरिपाठाचे वास्तविक स्वरुप काय आहे, याची कल्पना येईल। अध्यात्म शास्रात एकाच अभंगाचे किंवा संत वचनाचे दोन प्रकारे विवेचन केले जाते। (१)-सामान्य अर्थ (२)-गूढ अर्थ याला परोक्षवाद म्हटले आहे। परोक्षवाद म्हणजे दिसायला अर्थ असतो वेगळा, पण खरा गूढ अर्थ असतो वेगळा। तो मुद्दाम गुप्त ठेवलेला असतो। योग्य साधकाला तो योग्य वेळीच कळावा अशी याची रचना असते। यासाठी तो गुप्त ठेवलेला असतो। साधकाच्या योग्यतेनुसार हा अर्थ योग्य वेळी अंतरातून प्रकट होतो। कितीही तर्कबुध्दीने व्याकरणाने त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला तरी कृपेशिवाय तो समजत नाही। याला वेदात “परोक्षवाद” म्हणतात। वेदा: ब्रम्हात्मविषयास्रिकाण्डविषया इमे। परोक्षवादा: ऋषया:, परोक्षं च मम प्रियं॥२१-३५॥ “परोक्षवादा: ऋषया: परोक्षं च मम प्रिय:।” असे भागवतात भगवान श्रीकृष्ण स्वत: म्हणतात। वेदांमध्ये परोक्षवाद असतो। (दिसणरा अर्थ वेगाला, खरा अर्थ वेगळा।) हा परोक्षवाद मला प्रिय आहे। परोक्षवादामुळेच ग्रंथ वाचतांना अनेकांना बुध्दीभ्रम झाल्यासारखे वाटते। संत तुलसीदास म्हणतात, “श्रुति-पुराण बहु कहेऊ उपायी। छूट न अधिक अधिक उरझाई॥” ग्रंथातील अनेक मतभिन्नता पाहून वाचणर्याच्या मनाला ज्ञान होण्या ऐवजी भ्रम च उत्पन्न होतो। शास्रांचे अध्ययन करण्यासाठी सुध्दा तीक्ष्ण बुध्दी व गुरुकृपा आवश्यक असते, नाहीतर अर्थ न समजल्याने अनर्थ होतो, व शास्र हे शस्र बनते। त्यामुळे अध्यात्मात काही असो, साधना, तीव्र जिज्ञासा, तळमळ व ईश्वर कृपा याशिवाय काहीच प्राप्त होत नाही।” शास्र है बिल्कुल सच्चा। हम समझने मे कच्चा।” असे मुक्तानांद बाबांचे एक वचन आहे।
