
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुखदेव देवरे ,स्वामी विवेकानंद नगर, नांदगाव (नाशिक)

॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥
“देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियल्या॥१॥”-ज्ञानदेव हरिपाठ॥ “देव” या शब्दाचा काही विचार आपण केला। [ईश्वर, देव, पुरुष, गुरुशक्ती, चिति शक्ति, ओम्, ब्रम्ह हे सर्व एकाच देव शब्दाचे पर्यायवाचक शब्द आहेत। निर्गुण निराकार सर्वव्याप्त ब्रम्ह म्हणजेच “देव”] “देव” म्हणजे मूळ तत्व। सर्वत्र व्याप्त ईश्वर। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, “नभ तुजमाजि खेळे लपीथपी।” “हे गगनाचे पांघरुण होय देखा।” आकाश अनंत आहे, विचार केला तर आकाश कुठपर्यंत आहे याचा अंत लागत नाही। ईश्वर आकाशापेक्षाही मोठा, व्यापक आहे। ईश्वर आकाशाचे पांघरुण आहे, आकाश सुध्दा ईश्वरात लपंडाव खेळते। देव शब्दाचा इतका व्यापक अर्थ आहे।
“देव” शब्दाचे विवेचन आपण वाचले असेल किंवा आपल्या पैकी काहींना वाचतांना कंटाळा ही आला असेल। आपल्याला वाटत असेल हे काय किती किचकट आहे? त्यामुळे वाचण्याचा प्रतत्न ही केला नसेल। पण नीट विचार केला तर हे विवेचन अमूल्य आहे। याच्यात अनंत सामर्थ्य आहे। कोणत्याही कीर्तन प्रवचनात हे इतके सखोल चिंतन ऐकायला ही मिळणार नाही। यातील एक ही अक्षर असत्य नाही। हे विवेचन म्हणजे सर्व हरिपाठच आहे, हरिपाठच काय, सर्व वेदादि, सर्व शास्रांचे अनमोल सार आहे। हे समजल्यावर संपूर्ण हरिपाठ सुध्दा समजून घेण्याची गरज नाही। यात सर्व आहे। हरिपाठाचे इतर सर्व अभंग विवेचन न करता सुध्दा वाचून सहज समजतील। एकदा ही ज्ञानदृष्टी आली कि, सर्व समजू लागते। यात ईश्वराची, सद्गुरुंची दिव्य कृपा आहे। अनेक वर्षांचे हे गुरुप्रसादरुप चिंतन आहे। ईश्वरकृपेशिवाय, गुरुकृपेशिवाय किंवा पूर्वजन्माच्या साधने च्या कृपेशिवाय हे ब्रम्हज्ञान कोणाला प्राप्त होत नाही। कीर्तन प्रवचनात आपण फक्त वरवरचे ऐकतो। खरे ज्ञान, अंतर्बोध प्राप्त व्हायला कृपाच लागते।
आपली अध्यात्मिक साधना व अनुभव गुप्त ठेवावेत असा नियम आहे। गुरुदेव सिध्दपीठ गणेशपुरी आश्रमाची सुध्दा ही आज्ञा आहे कि, सिध्दयोगातील साहित्य, विडियो, रेकार्डिंग च्या कापी करु नये, जे कोर्स वेळोवेळी आश्रमातून प्रक्षेपीत केले जातात, किंवा ज्यांनी आश्रमात हे कोर्स केले, त्यांनी ते इतरांना सांगू नये। वाटल्यास त्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा रितसर नोंदणी करुन। हे विषय व्हाट्सअप सारख्या सोशल मेडियावर सर्रास पाठविण्यासाठी नाहीत। अयोग्य व्यक्तीकडून या ज्ञानाची निंदा सुध्दा होऊ शकते। अशा अनेक कारणांनी हे नियम असावेत। परंतु, गणेशपुरी सिध्दयोग सत्संग केंद्र जेथे आहेत त्या केंद्रात सत्संगाचे वेळी आपले साधनेतील अनुभव सांगावेत, अशी सद्गुरुंची आज्ञा आहे। व हे Spiritual spirit व Meditative Soul हे सिध्द मंच आहेत, येथे दुरुपयोग होणर नाही अशा अनेक गोष्टीचा विचार करुन सद्गुरुंचे स्मरण करुन विषयाला अनुसरुनच बाबा मुक्तानंदांचे व सिध्दयोग साहित्यातील काही विचार पाठविले जातात। हा सर्व विचार करुन व “देव” शब्द विवेचन हे किती अमूल्य व श्रेष्ठ आहे, याचे महत्व पटण्यासाठी सांगण्यात येते की, या विषयाचे चिंतन सद्गुरुकृपेने ईयत्ता ८ वी सन १९६५ पासून आजतागायत सुमारे ५७ वर्ष या “देव” शब्दावर चिंतन केले गेले आहे। सद्गुरुंपासून दीक्षा घेतल्या अगोदर पासून व नंतर सुध्दा। हरिपाठ अभंग चिंतन या निमित्ताने याचे विवेचन प्रक्षेपीत करण्यात आले। या विषयाचे “देव म्हणजे काय” चिंतन जे केले त्याचे सामर्थ्य असे आहे की, जर हा विषय मनात पूर्णपणे ठसला तर डोळे मिटून एका ठिकाणी बसून ध्यान करण्याची सुध्दा गरज नाही। उघड्या डोळ्यांनी केव्हाही, सतत, सहज ध्यान केव्हाही दृढ निश्चयाने सहज होऊ लागते। डोळे मिटून एका ठिकाणी किती वेळ बसणार? याला बाबा मुक्तानंदांनी उघड्या डोळ्यांनी होणारे सर्वोच्च ध्यान म्हटले आहे। हे ज्ञानोत्तर सर्वोच्च ध्यान आहे। देव शब्दाचे खरे ज्ञान झाल्यावर “सर्वं खल्विदं ब्रम्ह” सर्वत्र ब्रम्हच आहे या वेदांत वाक्याचे सत्यत्व पटते। संत एकनाथ महाराजांनी या बद्दल म्हटले आहे,” जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप। पूजा ध्यान जप त्यासी नाही।” जे जे दृष्टीला दिसते ते सर्व ब्रम्हच आहे ही दृष्टी आल्यावर त्याला पूजा, ध्यान, जप हे काहीच करायची गरज नाही। सर्व ब्रम्हच आहे असे नुसते म्हणून चालणार नाही। अंतरंगातून अत्यंत दृढनिश्चय पूर्वक सहज वाटले पाहिजे। “देव” शब्दाचे महत्व आत खोलवर ठसले पाहिजे। डोळे न मिटता सुध्दा उघड्या डोळ्यांनी सहज ध्यान होणे हेच “देव” शब्दाचे महत्व आहे। हा विचार मनात खोलवर गेला तर काहीच कष्ट पडत नाही, सहज ध्यान होते, ते ही डोळे मिटलेले असो किंवा उघडे असो। मन सुध्दा स्थिर करावे लागत नाही, आपोआप स्थिर होते, कारण मन सुध्दा ईश्वराचाच अंश आहे। ईद्रियाणां मनश्चास्मि। मन ईश्वराचे स्वरुप आहे।गीता।अ-१०॥ मन मूलत: ईश्वर स्वरुप असल्याने थोडा प्रयत्न केल्यास ते सहज ईश्वराकडे जाते।
सद्गुरुंच्या कृपेशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही हे खरे आहेच, पण याच बरोबर हे ही सत्य आहे कि, ईश्वराच्या कृपेशिवाय सद्गुरुंची भेट सुध्दा होत नाही। ज्यांना आपण देव म्हणतो त्या श्रीरामांना त्यांचे गुरु वसिष्ठ मुनी यांनी उपदेश केला कि, “यावन्नानुग्रह: साक्षात् जायते परमेश्वरात्। तावन्न सद्गुरु: कश्चित् सत्छास्रमपि न लभेत॥ योगवासिष्ट॥” जो पर्यंत ईश्वराची कृपा होत नाही, तोपर्यंत सद्गुरुंची भेट ही होत नाही व शास्रांचे ज्ञान सुध्दा होत नाही। संत तुलसीदास म्हणतात,” बिनु सतसंग विवेकु न होई। राम कृपा बिनु सुलभ न सोई॥” संत संगती शिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही, व ईश्वर कृपेशिवाय सद्गुरु ही भेटत नाही। “ईश्वर सर्व गुरुंचा ही गुरु आहे” असे पतंजल योगसूत्रात आहे। सर्व महापुरुषांना गुरु परंपरेने गुरु शक्ती, गुरुपद मिळते, पण सर्वांचे मूळ स्रोत हा ईश्वरच आहे। इश्वराने ईश्वर होण्यासाठी कधीहि तपश्चर्या किंवा साधना केली नाही, ईश्वर स्वयंसिध्द आहे। इतरांना अनेक जन्म ते पद मिळवण्यासाठी साधना करावी लागते। तसे ईश्वराचे नाही। विचार केला तर हे शब्दांनी सांगता येत नाही, कारण हा मूळ ईश्वरच गुरु आहे, ईश्वरच आपल्याला गुरु रुपाने भेटतो। गुरु शक्ती ही ईश्वरीय शक्ती आहे। ईश्वर आणि गुरु यात कसलाही भेद नाही। जो गुरु तोच शिव, जो शिव तोच गुरु आहे। तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरु।” अर्थात देवच गुरु आहे। सर्वत्र माते किरिटी। पाहे पा अंतर्बाह्य दृष्टी। मग मीचि होसी सेवटी लवण जैसे सागरी॥ज्ञानेश्वरी। जो ईश्वराला सर्वत्र पहातो तो मीठ सागराला मिळाल्यावर सागरच बनते तसा तो ईश्वरच होतो।
तया आत्मयाच्या भाका। न पडेचि दुसरी रेखा। जरि विश्व अशेखा भरले आहे॥अनु-७-१४६॥ अमृतानुभव या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी याच ईश्वराचे वर्णन केले, त्यांचा स्वानुभव सांगीतला। जरि हे विश्व भरलेले दिसते, तरी त्यात ईश्वराशिवाय दुसरे काहीच नाही। “देव” शब्दाचे चिंतन केल्याने “सर्वं खल्विदं ब्रम्ह” या वेद प्रतिपाद्य सिध्दांताचा अनुभव येतो। देव शब्दाचा विचार करतांना व एकच ईश्वर सर्वत्र आहे असे असतांना या जगात विषमता का आहे? ईश्वर आनंदस्वरुप आहे। (आनन्दो ब्रम्हेति विजानीयात्) आनंद हेच ईश्वराचे स्वरुप आहे। जग हे सुध्दा ईश्वरच आहे, [जग हे असिकी वस्तुप्रभा। अमृतानुभव। जग ईश्वराचाच प्रकाश आहे) असे असतांना जगात अनेक दु:ख आहेत, ईश्वर जर आनंदरुप तर जग जे ईश्वराचे स्वरुप आहे ते दु:खरुप का? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे, मग हे दु:खमय जगत् ईश्वर कसे? याचे ऊत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चांगले दिले आहे। जगत् आणि ब्रम्ह यांचा संबंध सांगतांना शास्रात २ मते दिसतात (१) जग मिथा आहे, भ्रम भासमय आहे, हा सिध्दांत जगद्गुरु शंकराचार्य यांचा आहे। ते म्हणतात,”श्लोकार्धेन प्रवक्षामि, यदुक्तं ग्रंथकोटीभि:। ब्रम्ह सत्यं जगत् मिथ्या जीवो ब्रम्हैव नापर:॥” अद्वैत सिध्दान्त। जे कोट्यावधी ग्रंथात सांगितले आहे त्याचा सार मी अर्ध्याच श्लोकात सांगतो, “ब्रम्हच सत्य आहे, जगत् मिथ्या आहे, जग हा १ भ्रम, भासमय, मृगजळवत आहे। सायंकाळच्या अंधुक प्रकाशात दोरावर सापाचा भास होतो तसे आहे। परंतु, सिध्दयोगाचा सिध्दांत आहे,”जगत् सत्य असून ते ईश्वराचे प्रत्यक्ष रुप आहे”। दोन्ही सिध्दांत पूर्ण सत्य आहेत कारण ते सिध्दांचे आहेत, कोणतेही खोटे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही। यांचा समन्वय साधण्यासाठी आपण ज्ञानेश्वर महाराजांचे ओवीचे चिंतन करु। जगत् ब्रम्हच आहे हे सागतांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, [मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित:॥९-४॥] या भगवद्गीतील श्लोकाचे भाष्य करतांना भगवान श्रीकॄष्ण अर्जुनाला उपदेश करतात,
माझेया विस्तारलेपणे नावे। हे जगचि नोहे आघवे। जैसे दूध मुराले स्वभावे। तरी तेची दही॥९-६४॥ का बीजचि जाहले तरु। अथवा भांगारचि अळंकारु। तैसा मज एकाचा विस्तारु। ते हे जग॥९-६५॥ ’ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, “हे जग मीच आहे, जग माझाच विस्तार आहे, जगत मीच आहे। आपल्याला वाटते जग दु:खमय तरी ते ईश्वर कसे? दूध व दही एकच। दूध मुरले, विरजण टाकून, की दही होते, दूध गोड आहे पण त्याचेच स्वरुप दही आंबट आहे, तरि ते दूधच आहे, दह्याचे मूळ दूध। तसे जगात मूळात दु:ख नाही, पण जरि ते भासले तरी ईश्वरच आहे। वृक्ष मोठा दिसतो, त्याला पाने फळे दिसतात, पण त्या झाडाचे बी असते त्यात वरुन काहीच दिसत नाही पण बीजात सर्व झाड सूक्ष्म रुपाने असतेच। बीज हेच झाड, तसे जगाचे मूळ बीज स्वत: ईश्वरच आहे, त्यामुळे जग हे ईश्वराचेच रुप आहे। दोन्ही दृष्टांत अपूर्ण पडतात म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तिसरे उदाहरण सांगीतले, सोने आणि त्याचे दागिने। दिसतांना वेगळे जरी दिसले तरी दागिने हेच सुवर्ण, तसेच जगत् हे ईश्वरच आहे। जगत् ईश्वराचे रुप, जग ईश्वरच आहे व ते आनंद स्वरुप आहे। जगात दु:ख नाहीच, परंतु अज्ञानामुळे दु:खमय भासते। अज्ञानी मनुष्याला जे जग दु:खमय भासते, तेच जग ज्ञानी पुरुषाला आनंदमय दिसते।
मावळवीत विश्वाभासु। नवल उदयला चंडांशु। अद्वयाब्जिनीविकासु। वंदू आता।। ॥१६-१॥ ज्ञानेश्वरी॥ माझ्या जीवन गगनात उगवलेला हा चित् सूर्य किती विलक्षण आहे, साधारण सूर्य उगवल्याने जगत् प्रतीयमान होते. तर या सूर्याच्या उदयाने जगत् निव्वळ आभास ठरुन पूर्णतया मावळून गेले.आणि त्याच्या किरणांनी अद्वैत अनुभवाचे कमल विकसून आतबाहेर सर्वत्र तो एकमेवाद्वितीय आनंदमय अनुभवास येत आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा गुरुकृपेचा अनुभव आला, तेव्हा जगत् हेच ब्रम्ह आहे असे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले। समान्य सूर्य उगवला कि सर्व कामाला लागतात, हा सूर्य जगाला प्रकट करतो, परंतु सद्गुरुकृपेने असा नवल, आश्चर्यकारक ज्ञान रुपी सूर्य माझ्या अंत:करणात उगवला की त्याने हे जगच नष्ट करुन टाकले। जगत रुपी भास नाहिसा झाला आणि सर्वत्र ब्रम्हच दिसू लागले। सामान्य सूर्य जगाला प्रकट करतो पण ज्ञानसूर्य जगालाच नष्ट करतो। जगत् भास नाहीसा होऊन अद्वैतरुपी कमळ अंतरंगात उमलले व सर्वं खलु इदं ब्रम्ह” सर्वत्र एक ब्रम्हच आहे अस अद्वैताचा अद्वितीय अनुभव आला। जगत् ब्रम्हच आहे हा सिध्दांत येथे सांगीतला।१४०० वर्ष वय असलेल्या चांगदेवाने जेव्हा कोरे च पत्र ज्ञानदेवांना पाठविले [तिर्थरुप लिहावे तर आपल्यापेक्षा ज्ञानदेव वयाने लहान, आशिर्वाद लिहावा तर निर्जीव भींत चालवली त्यामुळे गोंधळून गेलेल्या चांगदेवाने कोरेच पत्र लिहिले] व त्याचे ऊत्तर मागीतले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवा करीता जे पत्राचे ऊत्तर दिले, तेच चांगदेव पासष्टी। चांगदेव पासष्टी [६५ ओव्यात ब्रम्हज्ञानाचा उपदेश] च्या पहिल्या ओवीत चांगदेवाला उपदेश केला,” स्वस्ति श्री वटेशु। जो लपोनि जगदाभासु। दावी मग ग्रासु प्रगटला करी॥१॥” याचे २ अर्थ आहेत, वटेश म्हणजे वटेश चांगदेव, वटेश याचा दुसरा अर्थ परमेश्वर (देव)। हे चांगदेवा तुझे कल्याण असो, वटेश म्हणजे ईश्वर कसा आहे? तर जो ईश्वर जोपर्यंत गुप्त आहे, असून दिसत नाही, तो पर्यंत जगत् रुपाने भासतो, परंतु जेव्हा तो प्रकट होतो, आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा जगाचाच घास करतो, जगत् नाहिसे होते व ईश्वर प्रकट होतो। जगत् सत्य असून ते ब्रम्हस्वरुप आहे, हा सिध्दयोगाचा सिध्दांत सांगीतला।
सर्व वेदांचा सार व्यासांनी “वेदांत दर्शन” यात सांगितला। वेदांत शास्र म्हणजे अद्वैत, सर्वत्र एकच ईश्वर आहे याचे प्रतिपादन। वेदांत शास्राचे महत्व जगद्गुरु शंकराचार्यांनी एका श्लोकात सांगीतले। “तावद् गर्जन्ति शास्राणि जंबुका: विपिने यथा। न गर्जति महाशक्तिर्यावद् वेदांतकेसरी॥१॥” समजा, चांदणी रात्र आहे, अशा वेळी अरण्यात सर्व कोल्हे आनंदाने कोल्हेकुही करतात, आनदाने गर्जना करतात, त्यांना वाटते आपलेच राज्य आहे, पण त्यांची ही वल्गना, कोल्हेकुही कुठ पर्यंत? जोपर्यंत सिंहाची गर्जना ऐकू येत नाही, तो पर्यंतच। एकदा सिंहाची गर्जना ऐकू आली की सर्व कोल्हे भीतीने पळून जातात, त्यांचा आवाज बंद होतो, त्याच प्रमाणे इतर अनेक शास्रांचा मोठेपणा तोपर्यंतच, जोपर्यंत “वेदांत” रुपी सिंहाची गर्जना ऐकू येत नाही तोवरच। वेदांत शास्र सर्वश्रेष्ठ आहे। वेदांतातील देव शब्द म्हणजेच हरिपाठातील केलेले देव शब्दाचे विवेचन। या देव शब्दाचा हा अर्थ खोलवर अंतरात रुजला तर ऊघड्या डोळ्यांनी सहज ध्यान होते।
