
नांदगाव ( प्रतिनिधी) म. वि. प्र. संचलित अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय, भालूर येथे शाकांबरी गौरव अंतर्गत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र. नांदगाव तालुका संचालक अमित भाऊ पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती आराधनेने करण्यात आली. त्यानंतर संगीत शिक्षिका श्रीमती अहिरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या गीतमंचानेकार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीत व सुमधुर गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शिनगारे मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमास गायकवाड सर*यांनी अनुमोदन दिले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता, नटराज यांच्या प्रतिमेचे तसेच 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. या पूजनामुळे संपूर्ण कार्यक्रमास प्रेरणादायी व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. वैद्य सर,अभिनव मुख्याध्यापक श्री. पाटील सर*शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना आहेर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष धनाजी जठार, बापूसाहेब जाधव (सरपंच), शालुबाई थेटे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चांगदेव बाबा उगले, विठ्ठल दादा आहेर, परसराम शिंदे, दिनकर पाटील*आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अमित भाऊ पाटील यांनी विद्यालयाच्या विकासाबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यालयासाठी चार नवीन खोल्या मंजूर झाल्या असून त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच त्या कामाचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले*
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिनगारे मॅडम, श्रीमती खरोटे मॅडम व श्री. करवर सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
