
“वंशावळीच्याप्राचीनसरीतून”
जरा हटके नाव असणाऱ्या ह्या काव्यसंग्रहाविषयी अनेक जाणकारांकडून उत्कृष्ट अभिप्राय वाचायला मिळाले आणि मी संग्रह मागवला. तो मला मिळायला, मग मी निवांतपणे वाचायला बराच वेळ गेला. अगदी मनापासून एका वाक्यात सांगायचे तर “प्रतिभा जाळ मांडला आहेस तू .. चुलीतला आणि काळजातला सुद्धा..”
“बाई आणि चूल
जणू एकाच गर्भातून आलेल्या
जुळ्या बहिणी..”
67 कविता 111 पाने… ते मांडत जातात जे मांडायचे धैर्य यायला कित्येक पिढ्या गारद झाल्या आहेत. आजही आम्ही so called शहरी सुशिक्षित स्त्रिया किती पोकळ फेमिनिझमचे ढोल बडवत बसलो आहोत .. हा संग्रह वाचल्यावर मी निःशब्द झाले . कौतुक करू तरी कोणत्या शब्दात जिथे जखमांच्या वेदना अजून ठसठसताहेत.
“बाई
पहाटे पहाटे
जात्यात भरडायची
रात्रीचे घरंदाज हुंदके”
ह्या संग्रहातील प्रत्येक कविता मुक्तछंदात आहे नव्हे ती सर्वार्थाने मुक्त आहे .. कवयित्रीने कोणत्याही आकृती बंधाचा अट्टाहास केला नाही ह्यातच त्याचे प्रवाहीपण दिसून आले. त्या विलक्षण प्रामाणिक आहेत.. म्हणूनच त्या कणखर , मजबूत आहेत.
“कोऱ्या डायरीच्या
पहिल्या पानावरचा
श्री खास असतो
शेवटच्या पानापर्यंत…
तितकाच खास
आणि गडद असतो
बाईच्या कोऱ्या मनावर
उमटलेला पहिला पुरुष
तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत..”
स्त्रियांच्या जगण्याची धग , तिची स्पंदने, तिच्या व्यथा वेदना मांडताना इतकी सहजता आहे की कविता कृत्रिमतेला छेद देते. कुठेही असा आव आणलेला नाही की मी बाई बिचारी.. उलट ती सहजपणे म्हणते “बाई पेटवली जाते, विहिरीत ढकलली जाते पण कधीच फास लावून घेत नाही बाई आत्महत्या करत नाही” ती कमालीची लढवय्या असते अश्रू पीत जाते पण जगत राहते.
कवितांमध्ये बाईच्या जगण्याचे अनेकविध कंगोरे अधोरेखित होतात. अगदी सासरी जाणाऱ्या मुलीवर कविता आहे तशीच आहे बाजारात विकल्या जाणाऱ्या मुलीवरही.. एकीकडे विधवेचे दुःख मांडणारी कविता आहे तर दुसरीकडे संसारी काच सुद्धा आहे.. कवयित्री सहज म्हणते..
“ऑफिसमध्ये
काम करणारी बाई
आणि
रस्त्यावर
खडी फोडणारी बाई
मला
दोन्ही सारख्याच वाटतात.
मंदिरात टांगलेल्या
भारदस्त पितळी
घंटेसारख्या….”
कष्टकरी ग्रामीण जीवनाचे अणकुचीदार काटेरी वास्तव रेखाटताना तिची कविता अधिक प्रभावी होत जाते.. “बाई विहिरीवर फक्त पाणी आणायला जात नाही तर मनाचा कासरा टाकून तळाशी जाते…. शेतातले तण काढावे तशे ती मुलीचे गर्भ उपटून टाकते… तिचा पदर काम करताना, दगडात /काट्यात अडकून फाटला नाही पण सावकाराचे दान घेताना दर वेळ टर्रकन फाटतो…
“बाई ग काळीज काढून ठेवलस हातावर…..!
“माझ्या जन्माच्या वेळी” ह्या पहिल्याच कवितेत ती म्हणते …
“आणि पुन्हा एकदा आली जलमाला
सोशिकतेचा वसा चालवणारी
एक असहाय मादी
नरांच्या पिढ्या
जलमाला घालण्यासाठी..”
एक वाचक म्हणून मला मनापासून कवितासंग्रह आवडला. मला वाटत प्रत्येक मुक्त मनाच्या स्त्रीने वाचलेच पाहिजे असे काहीतरी इथे आहे.. मला चटका लावून गेला पण तरीही कमालीचा वाचनानंद देऊन गेला.. अनेक ठिकाणी विचार करायला भागही पाडून गेला.
“पुरुषाच्या आयुष्यात
साखरेसारखी अन्
मिठासारखी
विरघळलेली असते
बाई.
त्याचाही नकळत
त्याच्या मध्ये
वावरत असते
बाई….”
त्याच्याही नकळत त्याच्यामध्ये वावरत असणारी ही बाई त्याला ज्या दिवशी भेटेल तो दिवस खरा..
प्रिय प्रतिभा,
तुझ्याशी थोडक्या संवादातून आणि अर्थातच तुझ्या धारदार लेखणीतून एक अनुबंध जुळले आहेत असे जाणवले म्हणून हक्काने ए म्हणतेय.. लिहीत रहा.. खूप खूप शुभेच्छा!💐
यशश्री_रहाळकर
