
लासलगाव, ता. २६ (प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी “संविधान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे व प्रमुख वक्ते प्रा.वाल्मिक आरोटे यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व भारताच्या संविधानाच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, सैन्य दलात कुपवाडा येथे कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी किसन गांगुर्डे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर्स स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. पोस्टर्स स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले वरिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा.वाल्मिक आरोटे यांनी भारतीय संविधान दिनाविषयी आपले मनोगत करताना राष्ट्राच्या उभारणीसाठी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी लढणाऱ्या नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे स्मरण केले आणि २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारताच्या धर्मनिरपेक्ष संविधानाचे स्मरण करून त्यांनी सर्वांना संविधानाची तत्वे आणि उद्देश आत्मसात करण्याचे आवाहन केले. यानंतर सर्व शिक्षक-प्राध्यापक व विद्यार्थी यांनी राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे, उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांना ही उद्देशिका कळावी यासाठी वाचन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी केला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा.प्रभाकर गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनिल गायकर यांनी केले तर आभार प्रा.देवेंद्र भांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील एन.एस.एस. व एन.सी.सी. चे विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
