
जळगाव निंबायती (वार्ताहर) – भारत नवनिर्माणात सर्वसमावेशक आणि सर्वन्यायी संविधानाची भूमिका महत्वाची आहे. भारतीय जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य संविधानाने केले आहे. असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप यांनी केले. ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात संविधान दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते.
यावेळी राज्यशास्त्राचे प्रा. अमोल अहिरे म्हणालेत, संविधानातील काही कलमे कालानुरूप बदलण्याचा व नवे कायदे करण्याचा अधिकार संसदेला असला, तरी संविधानाचे मूळ स्वरूप कोणीही बदलू शकत नाही. संविधान देशाचा सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ कायदा आहे. संविधानातील मौलिक तत्वे, मुलभूत हक्क व कर्तव्य नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. भारतातील लोकशाही आणि संविधानिक मूल्ये अबाधित राखण्यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे असे आवाहन अहिरे यांनी केले.

यावेळी प्रा. अहिरे यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन घेतले. तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना तसेच जेष्ठ सिनेअभिनेते धर्मेंद्र व डोंगराळे येथील चिमुकली यज्ञा दुसानेला श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता ११ वी व १२ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांची संविधानावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. जे. देवरे यांनी केले तर आभार एन. एस. अहिरे यांनी मानलेत.
