
नांदगाव (ता. नांदगाव) – मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव यांच्या वतीने १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. स्पर्धेत मुलांचे ८ व मुलींचे ३ संघ सहभागी झाले.
मुलांच्या गटात नांदगाव महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट रणनीती, दमदार रेड्स आणि भक्कम बचावाची छाप पाडत विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात जनता विद्यालय, मांडवड संघाने संघभावना व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे उद्घाटन मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक मा. इंजि. अमितभाऊ उमेदसिंग बोरसे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कबड्डीच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख करून म्हटले की, “कबड्डीसारख्या देशी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच विलक्षण चपळाई, टीमवर्क आणि मानसिक धैर्य विकसित होते. युवकांनी या खेळात अधिकाधिक सहभाग घेऊन ग्रामीण परंपरा व क्रीडा संस्कृती जपली पाहिजे.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देत सांगितले की,“कबड्डी हा खेळ विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, वेग, रणनीती आणि सामूहिक सहकार्याला घडवतो. स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.”
कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. श्री. योगेश पाटील, मा. श्री. अरविंद पाटील, तसेच पंच प्रमुख नांदगाव तालुका क्रीडा संकुलाचे मा. श्री. संजय त्रिभुवन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. एल. एम. गळदगे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार श्री. डी. एम. राठोड यांनी केले.
स्पर्धांचे एकूण नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी श्री. एल.एम.गळदगे (क्रीडा संचालक) यांनी यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांनी कबड्डीप्रेमींना थरारक अनुभव दिला. दमदार टॅकल्स, कौशल्यपूर्ण रेड्स आणि उत्तम क्रीडांगण व्यवस्थापनामुळे स्पर्धेची सांगता अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात झाली.
