
नाशिक:-(प्रतिनिधी ) दररोज अनेक अनुभव घेत आपण जीवन जगत असतो. अनुभवसिद्ध आयुष्य हे आपल्याला खूप शिकवून जात असतं. या अनुभवांतून भावभावनांची गुंफण केली तर उतम कविता निर्माण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री सरला सोनजे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात २०२वे पुष्प ‘सरल तरंग’ या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका सुनंदा पाटील होत्या.
कवयित्री सोनजे पुढे म्हणाल्या की, मानवी जीवनाचा संदर्भ निसर्ग आणि पर्यावरणाशी असतो. यासाठी निसर्ग जपून पर्यावरणाचा समतोल राखणे आपल्या हातात आहे. अनुभवलेली पंढरपूरची वारी समृद्ध करून गेली. ‘एकतरी वारी अनुभवावी!’ तो आनंद आयुष्यभरासाठी एक चैतन्य देऊन गेला. जीवनाचे सार्थक काय आहे; ते वारीतून कळाले. म्हणून जीवन आणि संस्कार यातून जगण्याचा मंत्र सापडला, असेही त्या म्हणाल्या.
अलका दराडे आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२८) ज्येष्ठ साहित्यिक ‘वास्तव शिवसेना व शिवसेनाप्रमुख’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
